नवी मुंबई : केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत ४ कोटी ५० लाख रुपये खर्च करून नवी मुंबईत हरितपट्टा विकसित करण्यासाठी लावलेल्या रोपटय़ांचे योग्य जतन केले जात नसल्याने हा खर्च पाण्यात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेने नेमलेले कंत्राटदार झाडांची निगा राखणे, नियमित खत घालणे तर दूरच मात्र पाणीदेखील घालत नसल्याने अनेक झाडे सुकली आहेत.

केंद्र शासनातर्फे २०१५ ते २०१८ या तीन वर्षांसाठी अमृत योजना यंदा मंजूर करण्यात आली आहे. यात केंद्र सरकारचा ५० टक्के आणि महापालिका व राज्य सरकारचा प्रत्येकी २५ टक्के निधी आहे. शहरात विविध ठिकाणी हरितपट्टा विकसित करण्याचे काम सुरू आहे, मात्र पालिकेचे नियंत्रण नसल्याने कामाचा योग्य दर्जा राखला जात नसल्याचे दिसते. लावण्यात आलेल्या झाडांची संख्या कोटींच्या घरात असताना प्रत्यक्षात तग धरलेल्या झाडांचे प्रमाण अतिशय कमी आहे. वाशी, सानपाडा, नेरुळ व घणसोली विभागात सध्या हरितपट्टा विकसित करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेने या कामासाठी ठेकेदारांची नेमणूक केली असून ठेकेदारांवर पालिकेचा अंकुश नसल्याचे दिसते.

नेरुळमध्ये ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या शेजारीच असलेल्या जागेवर हरितपट्टा विकसित करण्याचे काम करण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी करण्यात येत असलेल्या कामावर पालिकेच्या उद्यान विभागाचे नियंत्रण नाही. या योजनेअंतर्गत सुपारी, नारळ व इतर फळझाडांची लागवड करण्यात येत आहे, मात्र तिथे लावण्यात येत आलेली झाडे आताच सुकली आहेत. या पट्टय़ात चालण्यासाठी बांधलेल्या ट्रॅकचे कामही व्यवस्थित झालेले नाही. त्यासाठी डेब्रिजचा वापर करण्यात आला आहे. या भागात अनेक दिवसांत ठेकेदाराने पाणीही शिंपडलेले नाही. झाडे लावतानाच सुकल्यासारखी दिसत आहेत.

पालिकेचे साहाय्यक उद्यान अधिकारी, उद्यान अधीक्षक व उद्यान उपायुक्त यांनी कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन ठेकेदारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. घरोंदा येथील अमृत योजनेअंतर्गत कामाची आयुक्तांनी नुकतीच पाहणी केली. त्या वेळी ठेकेदाराच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.

नवी मुंबईत एमआयडीसी क्षेत्र मोठे आहे. साहजिकच प्रदूषणाचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वृक्ष लागवड करणे अपरिहार्य आहे. दर पावसाळ्यात राज्य शासन व महापालिकेच्या माध्यमातून वृक्ष लागवड केली जाते. शहरातल्या विविध संस्था मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड करतात, पण त्यातील किती झाडे जगतात, हा प्रश्नच आहे.

घणसोलीत हरितपट्टा विकसित करण्यात येत आहे. या कामावर व ठेकेदारावर पालिकेचे नियंत्रण आवश्यक आहे, असे मत मनसेचे संदीप गलगुडे यांनी मांडले.

अमृत योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांवर पालिकेचे नियंत्रण आहे. शहरात प्रचंड उष्मा असल्याने झाडे सुकली आहेत. झाड लावल्यानंतर सुरुवातीला थोडे सुकतेच, परंतु काही काळात पुन्हा जोमाने वाढते. जिथे ही योजना राबवण्यात येत आहे, त्या ठिकाणांची पाहणी करण्यात येईल.

– तुषार पवार, उपायुक्त, उद्यान विभाग

वृक्ष लागवड

घणसोली – ४०००

वाशी, सानपाडा – ९०००

नेरुळ – २०००

हरितपट्टय़ावरील खर्च

घणसोली – १.५ कोटी

वाशी, सानपाडा – २ कोटी

नेरुळ – १ कोटी