19 December 2018

News Flash

एलईडी मासेमारी बंद

शेतीतील माशांच्या प्रमाणातही घट झाल्याने अनेक कुटुंबांचा पारंपरिक व्यवसाय बंद झाला आहे.

एलईडी मासेमारीला दिलेली परवानगी केंद्र सरकारने जारी केलेल्या १० नोव्हेंबरच्या आदेशनंतर रद्द केलेली आहे.

मच्छीमार संघटनांच्या इशाऱ्यानंतर केंद्रसरकारचे आदेश

मासेमारी करताना अधिक मासळी मिळावी म्हणून एलईडी दिवे वापरण्याच्या पद्धतीमुळे समुद्रातील मासळीचे मूळच नष्ट होण्याची भीती व्यक्त होत असताना केंद्रातील कृषी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या फिशरीज विभागाने परिपत्रक काढून या मासेमारी पद्धतीवर बंदीचा निर्णय घेतला आहे.

मासेमारीवर आधारित करोडो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे असल्याने करंजा येथे रायगड जिल्हा मच्छीमार खलाशी संघटनेने बैठक घेऊन एलईडी मासेमारी बंद करण्याची मागणी राज्य व केंद्र सरकारकडे केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने २९ ऑगस्ट २०१६ ला काही अटी व शर्तीसह एलईडी मासेमारीला दिलेली परवानगी केंद्र सरकारने जारी केलेल्या १० नोव्हेंबरच्या आदेशनंतर रद्द केलेली आहे. त्याचप्रमाणे एक्स्लुझिव इकॉनॉमिक झोन (ईईझेड) परिसर ही बंद केलेला आहे. मासेमारीच्या या पद्धतीचा परिणाम हा केवळ मासे कमी होण्यावरच नाही. तर संपूर्ण जैवविविधताच धोका आल्याने ही पद्धत बंद करण्याची मागणी मासेमारी संघटनांनी केली होती.

सध्या खाडी व समुद्रकिनाऱ्यावरील मातीच्या भरावांमुळे किनाऱ्यावरील मासे व जैवविविधतेचे संरक्षण करणाऱ्या खारफुटीची जंगलेही नष्ट होत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर खाडीत तसेच खाडीकिनाऱ्यावरील शेतीतील माशांच्या प्रमाणातही घट झाल्याने अनेक कुटुंबांचा पारंपरिक व्यवसाय बंद झाला आहे. त्यामुळे ही बंदी आवश्यक असल्याचे मत स्थानिक मच्छीमारांचे आहे. तर मासेमारी व्यवसाय हा सध्या मालक आणि खलाशी यांच्यातील भागेदारीचा आहे. त्यामुळे हा व्यवसाय टिकला तरच खलाशांच्या कुटुंबांना उत्पन्न मिळेल. या उद्देशानेच आमचा फायदा असतानाही या पद्धतीला विरोध असल्याचे मत रायगड जिल्हा मच्छीमार खलाशी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.

तटरक्षक दलाकडे जबाबदारी

या बंदीनंतर समुद्राच्या संरक्षणासाठी असलेल्या तटरक्षक दलाने दक्षता घेऊन अशा प्रकारच्या मासेमारीवर लक्ष द्यावे. तसेच या भागातील मेरिटाइम बोर्डाने कारवाई करावे, असे आदेश मंत्रालयाकडून प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने नव्याने परिपत्रक जारी करून यापूर्वी १२ नॉर्टीकलपासून पुढे काही अटी व शर्तीसह असलेली एलईडी मासेमारी बंद करून राज्यासह देशातील सर्व किनाऱ्यावरील ही मासेमारी पद्धत पूर्णपणे बंद केली आहे.

-अविनाश नाखवा, आयुक्त, साहाय्यक मत्सव्यवसाय, रायगड.

First Published on November 14, 2017 2:17 am

Web Title: central government ban led light for fishing