05 August 2020

News Flash

स्वच्छतेत खोदकामांची बाधा?

रस्त्यांवरील खड्डय़ांभोवती कापडी आवरण; फेब्रुवारीत केंद्रीय सर्वेक्षण पथक नवी मुंबईत

(संग्रहित छायाचित्र)

रस्त्यांवरील खड्डय़ांभोवती कापडी आवरण; फेब्रुवारीत केंद्रीय सर्वेक्षण पथक नवी मुंबईत

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शहरात सध्या ठिकठिकाणी स्वच्छतेचा जागर सुरू असताना येत्या फेब्रुवारीत होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणात रस्ते खोदकामाची बाधा येण्याची शक्यता आहे.

एरवी नागरिकांच्या सुरक्षेसाठी खोदकामांभोवती मार्गावरोधक (बॅरीकेड्स) संरक्षक जाळ्या उभारण्यास पालिका नेमकी विसरत असताना सर्वेक्षणासाठी येणाऱ्या केंद्रीय पथकाच्या नजरेतून धुळीने व्यापलेल्या जागा सुटाव्यात म्हणून त्याभोवती हिरव्या रंगाच्या कापडी जाळ्या गुंडाळण्यात आल्याबद्दल अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी पालिकेने जंग जंग पछाडले आहे. त्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे. नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यात विविध स्वच्छता योजनांचा समावेश आहे. रस्त्यांवरील कचरा हटविण्याबरोबरच मोकळ्या भिंतींवर रंगकामही केले जात आहे.

सर्वेक्षण २०१९ मध्ये नवी मुंबईला सातव्या स्थानावर पसंती देण्यात आली होती. स्वच्छता सर्वेक्षणातील नागरिकांच्या सहभागाला प्रथम क्रमांक मिळाला होता. स्वच्छ सर्वेक्षणात पालिका स्तरावर हे प्रयत्न होत असताना  रस्ते खोदकामांची बाधा सर्वेक्षणात येणार नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

येत्या एप्रिलमध्ये पालिका निवडणुका होत आहेत. यासाठी प्रभागातील विकासकामांवर पालिका सदस्यांचे लक्ष आहे. सध्या शहरात दोन हजार कोटींहून अधिक रुपये खर्चाची विकास कामे सुरू आहेत. यात नाले दुरुस्ती रस्ते आणि पदपथ दुरुस्ती इत्यादी कामे सुरू आहेत.

वाशी सेक्टर-२९, सेक्टर-११ जुहूगाव, अरेंजा सर्कल आणि ऐरोली या भागांत मोठय़ा प्रमाणात खोदकामे करण्यात आली आहेत. या खोदकामांभोवती  हिरव्या जाळ्या  लावण्यात आल्या आहेत.

आगामी स्वच्छता सर्वेक्षणात  सप्ततारांकित गुणांकन मिळविण्याचा नवी मुंबई पालिकेचा मानस आहे. त्यामुळे स्वच्छता सर्वेक्षणाच्या तोंडावर शहरात सुरू असलेले खोदकाम पूर्ण करून तिसऱ्या स्थानावर कायम राहण्याचे आव्हान पालिकेसमोर असेल.

शहरात विकास कामे सुरू आहेत.  ती ठरलेल्या कालावधीत पूर्ण करण्यात येतील. शहरातील स्वच्छता सर्वेक्षणाचा यावर काही परिणाम होणार नाही. खोदकामाच्या ठिकाणी लावलेल्या कापडी जाळ्या या  नागरिकांना धुळीचा त्रास होऊ नये यासाठी वापरण्यात आल्या आहेतत.

-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त नवी मुंबई पालिका

गावठाणे मात्र दुर्लक्षित

नवी मुंबई : पालिकेची स्वच्छ सर्वेक्षणाची व्याप्ती केवळ शहरापुरतीच मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई लगतच्या गावठाण परिसरात स्वचेछता मोहीम अद्याप पोहोचली नसल्याचे वास्तव नजरेस येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. गावठाण भागांतील मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

नवी मुंबई शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी नवी मुंबईत शहरातील रस्ते,पदपथ आणि शहरातील महत्त्वाचे चौक ,दर्शनी भिंती आणि उड्डाणपुलांना  रंगरंगोटी केली जात आहे. याशिवाय विविध ठिकाणी  स्वच्छतेची कामे केली जात आहेत.

पालिका क्षेत्रात आमची आग्रोळी ते दिघा विभागातील ३० गावे आहेत. त्यामुळे या मूळ गावठाणांमध्येही शहर स्वच्छता सर्वेक्षण अभियान अद्याप का पोहोचलेले नाही, असा सवाल केला जात आहे. या लोकप्रतिनिधींनी गावांच्या गबाळ अवस्थेविषयी संताप व्यक्त केला आहे. महापौर जयवंत सुतार यांनी गावठाणांकडे लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्याचे स्पष्ट केले. अनेक गावे अस्वच्छ असल्याची बाब मंदाकिनी म्हात्रे यांनी निदर्शनास आणून दिली. गावात स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज स्वच्छता तदर्थ समितीचे सभापती नेत्रा शिर्के यांनी व्यक्त केली. यावर शहराला स्वच्छतेत वरचे स्थान मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे घनकचरा विभागाचे उपायुक्त  तुषार पवार यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 4:21 am

Web Title: central survey team in navi mumbai in february zws 70
Next Stories
1 वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलाचे काम लांबणीवर
2 पार्किंगच्या गोंधळामुळे प्रवासी त्रस्त
3 दक्षिण नवी मुंबई सिडकोच्या रडारवर
Just Now!
X