नवी मुंबई : हेमंत नगराळे यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून अखेर बदली झाली आहे. त्यांच्या जागी आलेले राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्यासमोर नवी मुंबईतील पांढरपेशा गुन्हेगारांना मोडून काढण्याचे आणि नवी मुंबई पोलीस दलाची ढासळलेली प्रतिमा उंचावण्याचे आव्हान आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हे तसे तुलनेने छोटे आयुक्तालय आहे. या आयुक्तालयाची हद्द पुढे खोपोली खालापूपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव आहे. अशा छोटय़ा आयुक्तालयाचा पदभार स्वीकारण्यास कार्यक्षम व प्रामाणिक अधिकारी फारसे उत्सुक नसतात. एकेकाळी लेडीज बार आणि इंधन भेसळीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराचा ‘ठाणेदार’ होण्यात चांगल्या अधिकाऱ्यांना रस नव्हता. काळाच्या ओघात हे दोन्ही अवैध धंदे नवी मुंबईतून हद्दपार झाले आहेत. त्यांची जागा जेएनपीटी बंदरातील कंटेनरमधील मालाची तस्करी आणि घर घेणाऱ्या गरजवंत ग्राहकांची तथाकथित विकासकांकडून होणारी फसवणूक या पांढरपेशा गुन्हेगारीने घेतली आहे. त्यात आता शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विकणाऱ्या टोळीने हैदोस घातला आहे. तीन प्रकारची ही गुन्हेगारी मोडून काढण्याचे मोठे आव्हान नवीन पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासमोर आहे.

गेल्या वर्षी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्ह्य़ांची नोंद ही तीन हजार ६५ इतकी आहे. यातील ६७ टक्के गुन्ह्य़ांची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याचा दावा केला जात आहे. यात ९ टक्के गुन्हेगारी ही पांढरपेशा प्रकारात मोडणारी आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण या भागात खूप मोठय़ा प्रमाणात बांधकामे गेली १० वर्षे सुरू आहेत. यात फसवणुकीची शेकडो प्रकरणे नवी मुंबईच्या आर्थिक गुन्हे विभागात प्रलंबित आहेत.

विकासकांकडून फसवणुकीत वाढ

पनवेल भागात अनेकांना विकासकांनी गंडा घातला आहे. सायराज निवारा प्रोजेक्टचा संचालक हनुमंत चव्हाण याने पाचशे ग्राहकांना फसवून वीस कोटी लुटले. कमांडर्स गेटवेचा शैलेश दावडाने दोनशे लोकांना फसवले. माजी नौदल अधिकारी ए. के. शर्माने अशाच प्रकारे पनवेलमध्ये घरे व बंगले देतो सांगून ५०० लोकांना लुटले. वाशीतील एका विकासकाने ८०० कोटी रुपये जमा करून परदेश गाठला. त्याची जाहिरात करणाऱ्या एका अभिनेत्रीलाही त्याने गंडा घातला.