लोकसत्ता वार्ताहर

नवी मुंबई : शहरात पावसाचे पाणी साचू नये यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने  दरवर्षी पूर्वमोसमी नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. यंदा ही नालेसफाई अपूर्णच आहे. सफाईची अंतिम मुदत उलटूनही अद्याप नालेसफाई शिल्लक आहे.  यंदा करोनाविरोधातील लढाईत  गुंतलेल्या पालिका कर्मचाऱ्यांमुळे सफाईच्या कामांसाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. याशिवाय नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेची कमतरता भासत आहे. तरीही ९० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने दावा प्रशासनाने केला आहे.

करोना काळात सर्व विभागातील कर्मचारी कामाला लागले आहेत, तर स्थलांतरित मजूर त्यांच्या मूळ गावी गेल्याने मनुष्यबळाचा तुटवडा भासत आहे. २५ मे अखेर असलेल्या वेळेत पालिकेला नालेसफाई पूर्ण करण्याचे आव्हान होते. मात्र, २५ मे नंतर ३० मे पर्यंत अंतिम मुदत वाढविण्यात आली. मात्र दुसरी अंतिम मुदत संपूनही शहरातील काही नाल्यांची सफाई अजून अपूर्णच आहे. काही नाल्यांच्या सफाईचा देखावा केला जात आहे.

घणसोली, कोपरखैरणे, मधील मुख्य नाल्याची, दिघा, एपीएमसी परिसरातील नाल्यांची सफाई होणे अजून बाकी आहे. खैरणे आणि कोपरी गावातील नाल्याची अर्धवट सफाई केली आहे. वाशी सेक्टर-१७मधील नालेसफाई सुरू आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये पावसाच्या पाण्यामुळे पाणी भरून दोन वेळा नवी मुंबईत तुंबली होती. मात्र यंदा करोनामुळे पावसाळ्याधीच्या  नाले सफाईला उशिरा  सुरूवात झाली आहे.

दरवर्षी एप्रिल महिन्यात नालेसफाईला सुरुवात होते. सफाईला यंदा करोना, टाळेबंदीमुळे मे महिन्यात सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका ठेकेदारांकडून नालेसफाई, गटार सफाई करून घेत असते.  आणि हे ठेकेदार बहुतांशी स्थलांतरित मजुरांकडून ही कामे करून घेतली जातात.  मात्र यंदा नाका कामगार, परराज्यातील मजूर मूळ गावी गेले आहेत.