विकास महाडिक
वडार समाजाचा राज्यव्यापी महामेळावा; मुख्यमंत्री उपस्थित राहणार
राज्यात जातीनिहाय नेत्यांची चलती असल्याने नवी मुंबई पालिकेचे विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील वडार समाजाचा १७ डिसेंबर रोजी सोलापूरमध्ये राज्यव्यापी महामेळावा आयोजित करीत भाजपातर्फे तिकीट मिळवून ऐरोली मतदारसंघ मिळविण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणी झाली असल्याचे समजते. या मेळाव्याला त्यांनी एकाच वेळी पक्षाचे नेते उद्धव ठाकरे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करून चर्चेची सर्व कवाडे उघडी ठेवली आहेत.
धनगर समाजाचे महादेव जानकर यांना भाजप सरकारने सत्तेत सामावून घेतले आहे. मराठा समाजाचे मोटे, नरेंद्र पाटील यांना जवळ केले आहे. कोळी समाजाचे रमेश पाटील यांना भाजपच्या कोटय़ातून नुकतीच आमदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या समाजाची मोट बांधून त्या बळावर सत्ता सोपान गाठण्याची अहमिका सुरू झाली आहे.
नवी मुंबई पालिकेसारख्या छोटय़ा शहरात राजकारणाचा श्री गणेशा केलेल्या चौगुले यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांची साथ सोडल्यानंतर शिवसेनेत स्वतंत्र अस्तित्व तयार केले. मात्र मागील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने माजी पालिका आयुक्त विजय नाहटा यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. त्यामुळे एका शहरात दोन सत्तास्थाने निर्माण झाल्याने पक्षात तीन गट तयार झालेले आहेत. त्यामुळे पक्षातून आता विधानसभेसाठी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. हे ओळखून चौगुले यांनी आपले कार्यक्षेत्र बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या पाश्वभूमीवर ते लवकरच भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता आहे. सोलापुरात वडार समाजाचे शक्तीप्रदर्शन करण्याचा त्यांच प्रयत्न राहणार आहे.
भटक्या विमुक्त जमातीतील एक जात असलेला वडार समाज गेली अनेक वर्षे दुर्लक्षित आहे. शेजारच्या कर्नाटकमध्ये आमच्या समाजाचे आठ आमदार आहेत. राज्यातील १८ मतदारसंघात हा समाज निर्णायक आहे. सोलापूरमध्ये समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे महामेळावा सोलापूरमध्ये घेण्यात आला असून मागण्यांसाठी त्यानंतर मुंबईत धडक दिली जाणार आहे.
– विजय चौगुले, विरोधी पक्षनेते , नवी मुंबई महापालिका
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2018 2:50 am