आंबे पिकवण्यासाठी बंदी घातलेल्या कॅल्शियम कार्बाईडचा वापर

भारत आणि पाकिस्तानमध्ये हापूस आंबा पिकविण्यासाठी सर्रासपणे वापरण्यात येणाऱ्या कॅल्शियम कार्बाईडवर सरकारने बंदी घातल्यानंतरही तुर्भे येथील एपीएमसीच्या घाऊक फळबाजारात हापूस आंबा झटपट पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड या घातक रसायनाचा वापर केला जात आहे. अशा प्रकारे पिकवलेला आंबा खाणाऱ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

देशाच्या विविध भागांतून कच्चे हापूस आंबे तुर्भे येथील एपीएमसीच्या घाऊक फळबाजारात विक्रीसाठी आले आहेत. या कैऱ्या पिकवण्यासाठी अनेक व्यापारी आजही कॅल्शियम कार्बाईड या घातक रसायनाचा वापर करत असल्याचे आढळले आहे. २४ तासांसाठी या रसायनाचे खडे कागदात बांधून ठेवल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त उष्णतेमुळे हिरवे आंबे पिवळे होतात. जीवघेणी स्पर्धा आणि बाजार काबीज करण्याच्या हव्यासापोटी काही व्यापारी ही प्रक्रिया करत असल्याचे दिसून आले आहे.

कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून पिकविण्यात आलेला आंबा खाल्यास तोडांच्या आतील भागात फोड येणे, त्वचेवर डाग उमटणे, पचनविकार होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या विषारी रसायनामध्ये अर्सेनिकचे अंश असल्याने कॅल्शियम कार्बाइड युक्त आंबा खाल्ल्यास कर्करोग होण्याची शक्यताही वर्तवली जाते. त्यामुळे जागतिक आरोग्य संस्थेने या रसायनाच्या वापरावर कडक र्निबध घातले आहेत. राज्य सरकारनेही काही वर्षांपूर्वी या रसायनाचा वापर करून हापूस आंबा पिकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तरीही एपीएमसीच्या घाऊक फळ बाजारात काही व्यापारी या रसायनांचा वापर हापूस आंबे पिकविण्यासाठी करत आहेत. हे आरोग्याशी खेळण्यासारखे असल्याचे मत नारायण चव्हाण या ग्राहकाने व्यक्त केले.

फरक कसा ओळखावा?

नैसर्गिकरत्या पिकविण्यात आलेला हापूस आणि कॅल्शियम कार्बाईडद्वारे पिकवलेला आंबा यातील फरक ओळखणे सोपे असते. रसायनांच्या मदतीने पिकविलेला आंबा हाताने दाबल्यास नरम लागतो, पण नैसर्गिकरीत्या पिकवलेला हापूस कडक लागतो. कॅल्शियमध्ये पिकवलेला हापूस आकर्षक, पिवळाधमक दिसतो. नैसर्गिकरीत्या पिकवलेला हापूस आंबा इतका तेवढा पिवळा धमक दिसत नाही, पण त्याच्या देठाजवळ विशिष्ट सुगंध येतो.

उरणच्या बाजारात आंब्यांची आवक वाढली

  • हापूस महागल्याने परवडणाऱ्या आंब्याना मागणी

उरणमधील बाजारात आंब्यांची आवक वाढली आहे. यंदा हापूस सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने ग्राहक १५०-२०० रुपये डझन दर असलेले आंबे खरेदी करत आहेत. उरण व अलिबाग येथील हे आंबे स्वस्तात उपलब्ध असून त्यांना मोठी मागणी आहे.

कोकणातील हापूस आंबे जगप्रसिद्ध असले तरी हंगामाच्या सुरुवातीला त्यांच्या किमती प्रचंड असतात. त्यांच्या किमती आवाक्यात येईपर्यंत अन्य प्रजातींचे आंबे खरेदी केले जातात.

सध्या उरणमधील स्थानिक बाजारांत उरण आणि अलिबागमधील आंब्याची मोठय़ा प्रमाणात आवक सुरू झाली आहे. आदिवासींकडूनही आंबे विक्री सुरू करण्यात आली आहे. हापूस आंबा आम्हाला परवडणारा नाही. त्यामुळे यावर्षी आंबा खाण्याची हौस ही

स्थानिक आंब्यांवरच भागवत आहोत, असे निकिता पाटील या महिलेने सांगितले. महागडय़ा आंब्याना ग्राहक नसल्यामुळे ते खराब होतात. त्यामुळे सध्या स्थानिक आंब्यांचीच विक्री करत आहोत, अशी माहिती आंबा विक्रेत्या गीता घरत यांनी दिली.

कॅल्शियम कार्बाईडने पिकवलेले कोणतेही फळ खाल्ल्यास जळजळ, मळमळ होणे, चक्कर येणे, तोंडात फोड येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे असे आजार होतात. सातत्याने सेवन केल्यास त्यातील अर्सेनिकमुळे कर्करोगही होऊ शकतो.

डॉ. प्रशांत जवादे, वैद्यकीय अधीक्षक, सार्वजनिक रुग्णालय, वाशी

बाजारातील कोणताही मोठा व्यापारी हे धैर्य करत नाहीत. ते गॅसवर आंबा पिकवतात. काही ग्राहक कॅल्शियम कार्बाईडने आंबे पिकवतात. बाजारात इथिलिनचा स्प्रे वापरून आंबे पिकविले जात आहेत. त्यात ३० टक्के घातक रसायने असल्याचे एफडीएचे म्हणणे आहे.

विजय बेंडे, आंबा व्यापारी, एपीएमसी बाजार, तुर्भे