24 April 2019

News Flash

रासायनिक कचरा नवी मुंबईत?

नवी मुंबईत मुंबई, ठाणे, कल्याण येथील राडारोडा गुपचूप वा चिरीमिरी देत टाकला जात असल्याचे प्रकार अनेकदा समोर आल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

उग्र वासाने महापे, पावणे गाव परिसरातील रहिवाशांचा श्वास गुदमरला

उग्र वासाने गुरुवारी रात्री महापे, पावणेगाव परिसरातील रहिवाशांचा श्वास गुदमरला. रात्री उशिरापर्यंत रहिवाशांसह प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला, मात्र वास कुठून येतोय हे समजले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बाहेरून नवी मुंबईत टॅंकरद्वारे रासायनिक कचरा टाकला जात असल्याची शक्यता निर्माण झाली असून याला प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.

नवी मुंबईत मुंबई, ठाणे, कल्याण येथील राडारोडा गुपचूप वा चिरीमिरी देत टाकला जात असल्याचे प्रकार अनेकदा समोर आल्या आहेत. यात आता रासायनिक कचरा टाकला जात असण्याची नवी शक्यताही समोर आली आहे.

गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास पावणेनजीक असलेल्या औद्योगिक वसाहतीत अचानक उग्र वास आणि धुक्याप्रमाणे धूर दिसू लागला. अनेक जण घराबाहेर पडले. मात्र कुणाला काही कळेना की काय होतेय. मात्र या उग्र वासाने श्वास घेणेही अवघड होत होते. महापे ते तुर्भे सविता केमिकल्सपर्यंत वास पसरला होता. ठाणे-बेलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनाही त्याचा त्रास जाणवत होता. मात्र वास नेमका कुठून येतोय हे समजत नव्हते. या वासाने नाकात, डोळ्यांत जळजळ होणे, उलटीसारखा त्रास, चक्कर तसेच डोकेदुखीचाही त्रास होत होता.

या घटनेची माहिती मिळताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री दोन वाजेपर्यंत वास कुठून येतोय याचा अंदाज त्यांनाही लागला नाही. या ठिकाणी असलेल्या रासायनिक कारखानदारांना कळवून कारखान्यात काही अपघात झाल्याने वास पसरला आहे का? याचीही शहानिशा करून घेण्यात आली. त्यांनी रहिवाशांना घाबरून न जाण्याचे आवाहन करीत या वासाने गंभीर परिणाम होणार नाहीत, असे सांगितले. या प्रकारामुळे बाहेरून नवी मुंबईत टॅंकरद्वारे रासायनिक कचरा टाकला जात असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

टँकरद्वारे कचरा टाकल्याची शक्यता

आम्ही रात्री घटनास्थळीच होतो. उग्रवास पसरला होता. सकाळपर्यंत त्याची तीव्रता होती. मात्र नंतर वातावरण सामान्य झाले आहे. आम्ही सर्वच ठिकाणी तपास करीत असून कुठे लिकेज आहे का? याचाही तपास केला. मात्र तसे आढळून आले नाही. या ठिकाणी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अन्य ठिकाणाचा रासायनिक कचरा टँकरद्वारे आणून टाकला जात असावा असा अंदाज आहे. आम्ही त्या दिशेनेही शोध घेत आहोत असे प्रदूषण नियंत्रणचे प्रादेशिक अधिकारी डॉ.अनंत हर्षवर्धन यांनी सांगितले.

First Published on November 3, 2018 4:39 am

Web Title: chemical waste in navi mumbai