19 October 2019

News Flash

चिक्की पुन्हा वादग्रस्त!

तुर्भे पालिका शाळेतील विद्यार्थिनीला सापडल्या अळ्या

तुर्भे पालिका शाळेतील विद्यार्थिनीला सापडल्या अळ्या

गेली अनेक वर्षे केवळ चिक्की खाऊन कंटाळलेल्या नवी मुंबई पालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना चिक्कीऐवजी अल्पोपाहार देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर फेटाळून ३७ हजार विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर मारण्यात आलेली चिक्की पुन्हा वादग्रस्त ठरली आहे. तुर्भे येथील एका पालिका शाळेतील विद्यार्थिनीच्या चिक्कीत अळ्या आढळून आल्याने चिक्की वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे ‘चिक्की हटाव’चा नारा विद्यार्थी पालकांमध्ये सुरू झाला आहे.

‘चिक्की की अल्पोपाहार’ प्रकरण जनहित याचिकेद्वारे न्यायालयात प्रलंबित असल्याने जुना ठेकेदार त्याची चिक्की विद्यार्थ्यांना पुरवीत आहे. लोणावला चिक्कीच्या नावाखाली ही चिक्की रबाळे येथील एका गोदामात तयार केल्या जात असल्याचा आरोपही केला जात आहे.

राज्यातील इतर शहरांत पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती सुरू असताना नवी मुंबईत मात्र दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढत आहे. त्यामुळे सीबीएसई शाळा सुरू करण्याची मजल मारणाऱ्या पालिका शाळांत आता विद्यार्थी संख्या चाळीस हजारांच्या घरात गेली आहे.

प्राथामिक विद्यार्थ्यांना माध्यन्ह भोजन म्हणून खिचडी किंवा पौष्टिक चिक्की देण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे नवी मुंबई पालिका शाळेतील ३७ हजार विद्यार्थ्यांना दररोज चिक्की पुरवठा केला जात आहे. या पुरवठय़ातील एका चिक्कीत बुधवारी तुर्भे येथील शाळा क्रमांक २० मधील एका विद्यार्थिनीला अळ्या सापडल्या. त्यांनी ही गंभीर बाब स्थानिक नगरसेविका शुभांगी पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या निकृष्ट दर्जाच्या चिक्कीचे प्रकरण ऐरणीवर आले. नवी मुंबई पालिकेमध्ये पुरवठा करण्यात येणारी चिक्की ही निकृष्ट असून त्यात कोणत्याही प्रकारचे प्रोटीन नाही असे दिसून येते. त्यामुळेच सहा माहिन्यांपूर्वी पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी मुख्याध्यापकांच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांनी चिक्कीला स्पष्ट शब्दात नाकारले होते. गेली बारा वर्षे एकाच प्रकारची चिक्की खाऊन कंटाळलेल्या विद्याय्र्थानी चिक्कीऐवजी जवळच्याच इस्कॉन संस्थेच्या वतीने देण्यात येणारे ताजे, सकस शिरा, उपमा, पोहे, दलिया हे पदार्थ नाष्टा म्हणून देण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेस या दोन पक्षांनी फेटाळला आहे. अल्पोपाहाराचा हा प्रस्ताव फेटाळल्याने प्रशासनाला जुनी चिक्की विद्यार्थ्यांच्या गळ्यात मारावी लागली आहे. चिक्की कंत्राट कायम राहावे यासाठी कंत्राटदाराने साम, दाम, भेद नीती वापरून आयुक्तांवर दबावदेखील आणला. त्यामुळे चिक्की विद्यार्थ्यांना चिकटवली गेली आहे.

हे चिक्की प्रकरण जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले आहे. त्यामुळे नवीन कंत्राटदाराला चिक्की पुरवठा करण्यास स्थागिती आहे. त्याचा फायदा जुन्या चिक्की कंत्राटदाराला झाला आहे. हे दोन्ही कंत्राटांमध्ये एकाच कंत्राटदाराचे हितसंबध गुंतलेले आहेत. त्यामुळे न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न असल्याने चिक्की पुरवठा न थांबविता नवीन कंत्राट थांबविले आहे. त्याचा फायदा जुन्या कंत्राटदाराला मिळालेला आहे, पण त्याची चिक्की अळ्या प्रकरणामुळे वादग्रस्त ठरली आहे.

चिक्की हटवण्याची मागणी

वर्षांला तीन कोटी रुपये खर्चाची चिक्की या विद्यार्थ्यांना पुरवली जाते. त्याची किंमत नवीन कंत्राटात आता बारा कोटी रुपये करण्यात आली आहे. शिक्षण करातून गरीब विद्यार्थ्यांना देण्यात येणारी ही चिक्की निकृष्ट असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. लोणावळा चिक्कीच्या नावाखाली ही निकृष्ट दर्जाची चिक्की हटवण्याची मागणी आता पालक करू लागले आहेत.

चिक्कीमध्ये सापडलेली अळी शाळेत आढळली नसून चिक्की घरी नेल्यावर आढळली आहे. अळी सापडलेली चिक्की व उर्वरित चिक्की तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविली आहे. अहवाल आल्यानंतर दोषी आढळ्यास कारवाई करण्यात येईल.   महावीर पेंढारी, अतिरिक्त आयुक्त, सेवा नवी मुंबई महानगरपालिका

विद्यार्थ्यांना चिक्की देण्याआधी शिक्षक चिक्की खाऊन खातरजमा करतात. तसेच पालिका प्रत्येक महिन्याला मुंबई महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेतून चिक्कीची तपासणी करून घेते.  संदीप सांगवे, शिक्षण अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका

First Published on April 12, 2019 12:40 am

Web Title: chikki scam in navi mumbai