शक्ती, भक्ती आणि निसर्गाचा त्रिवेणी संगम

स्वातंत्र्यलढय़ातील सुवर्णपान असलेल्या २५ सप्टेंबर १९३० च्या चिरनेर जंगल सत्याग्रहाला आज ८५ वर्षे पूर्ण होत असून या स्वातंत्र्याच्या रणवेदीला शक्ती, भक्ती आणि निसर्गाची उधळण असलेला परिसर लाभलेला आहे. त्यामुळे चिरनेरला पर्यटन स्थळ घोषित करून या परिसराचा विकास करण्याची मागणी अनेक वर्षे केली जात आहे. चिरनेरला हुतात्मा स्मारक, सत्याग्रहाचे ठिकाण तसेच पेशवेकालीन गणेश मंदिर व हिरवागार निसर्ग लाभला आहे. या परिसराचा विकास झाल्यास चिरनेरमध्ये पर्यटकांची संख्या वाढून देशाच्या लढय़ाचा इतिहास भावी पिढीला समजण्यास मदत होणार आहे. या मागणीची दखल घेत जिल्हा परिषदेने चिरनेरला क वर्ग पर्यटन स्थळ घोषित केल्याची माहिती पंचायत समितीने दिली आहे. मात्र तरीही चिरनेरला विकासाची आस लागून राहिली आहे.
२० लाखांचा विकास निधी
जिल्हा परिषदेने चिरनेरला क वर्ग पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे आमदार मनोहर भोईर यांच्या माध्यमातून मिळालेल्या विकास निधीतून या परिसराचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे शाखा अभियंता सुधीर मढवी यांनी दिली. त्यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चिरनेरचा इतिहास
चिरनेरमधील शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदारांना इंग्रज सरकारने जंगलातील लाकूडफाटे घेण्यास तसेच झाडे तोडण्यास मज्जाव केला होता. अनेक कुटुंबांचे इंधनाचे साधनच हिसकावून घेण्याचा हा प्रकार होता. याविरोधात चिरनेर, कळंबूसरे, मोठी जुई, विंधणे, खोपटे, कोप्रोली, पाणदिवे, पिरकोन, वशेणी, धाकटी जुई, बोरखार, कंठवली आदी गावांतील नागरिकांनी गावोगावी जमा होऊन महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी होण्याचा निर्धार केला. त्यासाठी सत्याग्रहाची घोषणा करून २५ सप्टेंबर १९३० या दिवशी चिरनेर येथील आक्कादेवीच्या माळरानावर परिसरातील शेकडो नागरिक जमा झाले. परिसरातील बारा बलुतेदारांनी ब्रिटिश सरकारच्या कायद्याचा भंग करीत वृक्षतोड करण्यास सुरुवात केली. त्या वेळी मामलेदाराने आदेश दिल्यानंतरच गोळीबार केला जात होता. तशी मागणी पोलिसांनी केली असता मामलेदारांनी ती देण्यास नकार दिल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी पहिली गोळी मामलेदाराला घालून बेछूट गोळीबार सुरू केला. या गोळीबारात नाग्या महादू कातकरी, धाकू बारक्या फोफोरकर (चिरनरे), रघुनाथ मोरेश्वर शिंदे (कोप्रोली), रामा बामा कोळी (मोठी जुई), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), परशुराम रामा पाटील(पाणदिवे), हसुराम बुधाजी घरत (खोपटे), आळू बेमटय़ा म्हात्रे (दिघोडे) यांनी हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांची आठवण म्हणून चिरनेर येथे उभारण्यात आलेले स्मारकही ब्रिटिशांनी नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र लढाऊ जनतेने तो पुन्हा एकदा चिरनेर येथे मोठय़ा दिमाखाने उभा करून या आंदोलनातील हुतात्म्यांची स्मृती जपली.