उरणमधील सर्वात मोठय़ा मतदारसंघात आरोग्य, पाणी, शेतीकडे दुर्लक्ष

चिरनेर या जिल्हा परिषद मतदारसंघाला ग्रामीण आरोग्य, भातशेतीच्या भरतीमुळे होणारे नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच विकासाच्या नावाने सुरू असलेली निसर्गाची लूट या समस्यांनी ग्रासले आहे. चिरनेर मतदारसंघ हा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार मतदारसंघांपैकी मतदार व लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे. निसर्गाने संपन्न असलेल्या या मतदारसंघाचे नेतृत्व आतापर्यंत काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष तसेच शिवसेनेनेही केले आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ सध्याच्या शेकाप काँग्रेस आघाडीतही काँग्रेसकडे आला आहे. तर त्यांच्या विरोधात शिवसेना, मनसे, भाजप आहेत.

रायगड जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाच्या फेररचनेत पुन्हा एकदा चिरनेर हा मतदारसंघ तयार झाला आहे. उरण तालुक्याचे झपाटय़ाने औद्योगिकीकरण होत असताना या मतदारसंघात आजही शेती आहे. शेती आणि शेतकरी असलेल्या या मतदारसंघातही उद्योगांनी शिरकाव केला आहे. त्यामुळे बंदरावर आधारित गोदामांची उभारणी झाली आहे. या परिसरातील भातशेती ही खाडी किनाऱ्यावर आहे. समुद्राच्या भरतीच्या पाण्यापासून शेतीचा बचाव करण्यासाठी किनाऱ्यावर उभारण्यात आलेली बांधबंदिस्ती कमजोर झाली आहे. त्यामुळे समुद्राच्या मोठय़ा उधाणात शेकडो एकर पिकत्या जमिनी नापीक होऊ लागल्या आहेत. या संदर्भात मागील सरकारने तसेच जिल्ह्य़ाच्या विद्यमान पालकमंत्र्यांनीही पाहणी करून बंदिस्तीची दुरुस्ती करण्याचे आश्वासन देऊन दोन वर्षे झाली आहेत. तरीही स्थिती जैसे थे आहे.

आरोग्याचा प्रश्न

उरण तालुक्याचा ग्रामीण भाग म्हणून या पूर्व विभागाची ओळख आहे. उरण शहरापासून १५-२० किलोमीटर अंतरावर असलेल्या येथील गावांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेने कोप्रोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारलेले आहे. या आरोग्य केंद्रातील असुविधांमुळे नागरिकांना उपचारासाठी उरण, पनवेल तसेच नवी मुंबई गाठावी लागते. हे केंद्र रात्रीच्या वेळी अनेकदा बंद असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांकडून केल्या जात आहेत.

या मतदारसंघातील पुनाडे धरणाच्या परिसरातील आठ गावे पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरी जात आहेत. तर दुसरीकडे उरण परिसरातील जंगल व डोंगरातून माती काढून येथील डोंगर सपाट केले जात आहेत. त्यात येथील शेकडो वर्षांच्या झाडांची कत्तल करून निसर्गाची लूट केली जात आहे.

चिरनेरमधील गावे

चिरनेर, कळंबुसरे, मोठीजुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, पिरकोन, पाले, गोवठणे, आवरे, सारडे, वशेणी व पुनाडे या गावांचा समावेश असलेला मतदारसंघ आहे. एकूण मतदार संख्या २९ हजार ९३७ आहे. यातील १४ हजार ५०४ पुरुष तर १५ हजार ४३३ महिला आहेत. तालुक्यातील चार मतदारसंघांपैकी हा मतदारसंघ सर्वात मोठा आहे.