पनवेल शहर महापालिकेचे महापौर पदावर पुन्हा एकदा महिला विराजमान होणार आहे. मात्र या वेळी खुला प्रवर्ग महिला सदस्यांसाठी पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने भारतीय जनता पक्षाची महिला सदस्यांमध्ये महापौर पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. पनवेलचे भाजपचे सर्वेसर्वा माजी रामशेठ ठाकूर व त्यांचे पुत्र प्रशांत ठाकूर हे दुसऱ्यांदा महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकतात याकडे सर्वाचे पुन्हा एकदा लक्ष लागले आहे.

डॉक्टर कविता चौतमोल यांनी पनवेलचा कारभार मागील अडीच वर्षे पूर्ण केला आहे. सध्या राज्यात असणाऱ्या राजकीय अस्थिरतेमुळे पनवेलमध्येही भाजपच्या गोटात निरुत्साहाचे वातावरण आहे. यामध्येच सोडतीमध्ये महापौर पद हे महिला आरक्षण पडल्याने पुरुष सदस्यांची मोठी कोंडी झाली आहे. २०१७ साली झालेल्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पनवेलला उच्चशिक्षित व आरोग्याची जाण असणाऱ्या सदस्यांकडे महापौर सोपवून नवीन पनवेल वसाहतीला

ठाकूर पितापूत्रांनी मोठी संधी दिली होती. मात्र बुधवारी खुला प्रवर्ग महिलांसाठी पनवेलचे महापौर पदाचे आरक्षण पडल्याने भाजपच्या निष्ठावंतांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पनवेलमध्ये सर्वाधिक चर्चा चारुशिला घरत यांच्या नावाची आहे. त्याचसोबत क्रमवारीने पनवेल शहरातून दर्शना भोईर, खारघरमधून लीना गरड, संजना कदम, नेत्रा पाटील रोडपाली येथील प्रमिला पाटील यांच्या नावाची आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर हे चौतमोल यांनाच पुन्हासंधी देतात की चारुशिला घरत यांच्या अनुभवाला साद घालतील की सिडको नोडमधील आतापर्यंत संधी न दिलेल्या खारघर वसाहतीला संधी देतात हा प्रश्न अनुत्तरित आहे.

भारतीय जनता पक्ष शिस्तीप्रमाणे चालतो. डॉ. कविता चौतमोल यांच्या पहिल्याच कारकिर्दीत विविध विषय त्यांनी चांगलेच हाताळले. मात्र या उपर सर्व निर्णय  पक्षश्रेष्ठी ठरवतील तो आम्हाला मान्य आहे.

– परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महापालिका