तळोजा सेक्टर ३० जवळील मोकळ्या भूखंडावर प्रकल्प

राज्य सरकारला ५५ हजार घरे बांधण्याचे आश्वासन दिलेल्या सिडकोने दिवाळीत तळोजा येथे ११ हजार घरांच्या गृहनिर्माण प्रकल्पाला सुरुवात करण्याचे ठरविले असून ही घरे कोणत्या तंत्रज्ञानाने बांधावयाची याबाबत लवकरच निविदा काढली जाणार आहे. यापूर्वी सिडकोने परदेशातील मायवॉन, टनेल अ‍ॅडव्हान्स आणि प्री फॅब पद्धतीने सवा लाख घरे बांधली आहेत.

सिडको, म्हाडा यांच्या माध्यमातून राज्य सरकारने मागील काही वर्षांत परवडणारी घरे न बांधल्याने खासगी विकासकांचे चांगलेच फावले आहे. त्यात नवी मुंबईतील जमिनींचे भाव जास्त असल्याने विकासक छोटी घरे बांधण्याचे नाव घेत नाहीत. मोठय़ा घरांचे भाव ५० लाखांपेक्षा जास्त असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे मुंबईत दहा लाख, तर नवी मुंबईत पाच लाख घरे येत्या काळात बांधण्याचे सरकारने ठरविले असून सिडकोने घणसोली, तळोजा, पाचनंद या ठिकाणी ५५ हजार घरे बांधण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आश्वासनाची घोषणा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत केलेली आहे. सिडकोने मागील दोन वर्षांत उलवा, खारघर येथे स्वप्नपूर्ती, व्हॅलीशिल्प, उन्नती या प्रकल्पांत पाच हजार घरांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या घरांच्या व्यतिरिक्त सिडकोने डिसेंबर २०१९ पर्यंत ५५ हजार घरांचे लक्ष्य समोर ठेवले आहे. त्यातील ११ हजार घरे तळोजा सेक्टर ३० जवळ असलेल्या मोकळ्या भूखंडावर बांधणार आहे. या घरांचा विकास आराखडा तयार केला जात असून ही घरे कोणत्या तंत्रज्ञानाने बांधावयाची याबाबत लवकर तंत्रज्ञान निविदा काढली जाणार आहे. सिडकोने यापूर्वी एक लाख २८ हजार घरे बांधली आहेत. त्यातील बहुतांशी घरे मायवॉन, टनेल अ‍ॅडव्हान्स आणि प्री फॅब पद्धतीने बांधली गेली आहेत. देशपरदेश पातळीवर स्थापत्यशास्त्रात नेहमीच वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचा शोध लागत असून सिडको या प्रणाली वापरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. मायवॉन पद्धतीमुळे भिंतीची उभारणीदेखील सिमेंट क्राँक्रीटने केली जात असून त्यात प्लॅस्टरचा उपयोग कमी प्रमाणात केला जात असतो. हे तंत्रज्ञान भूकंपरोधक तंत्रज्ञान असून ते मुळात जपानमधील तंत्रज्ञान आहे. याच पद्धतीने टनेल अ‍ॅडव्हान तंत्रज्ञानामुळे घरउभारणीचा वेग अधिक असल्याचे दिसून आले आहे. प्री फॅब तंत्रज्ञानातही अधिक अद्ययावत पद्धतीने इमारतींची उभारणी केली जात आहे. तळोजा येथे या वर्षी बांधण्यास सुरुवात करण्यात येणाऱ्या ११ हजार घरे कोणत्या तंत्रज्ञानाने उभारण्याचा निर्णय जुलै महिन्यापर्यंत होणार असून त्यानंतर या कामाची निविदा काढली जाणार आहे. या महिन्याअखेर ही निविदा काढली जाणार असून निविदाकारांना दोन महिन्यांची मुदत दिली जाणार आहे. त्यामुळे दिवाळीत या ११ हजार घरांच्या प्रकल्पाची सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे सिडको सूत्राने सांगितले. विमानतळ प्रकल्पाच्या मागे लागल्याने सिडकोचे मूळ कार्य मागे पडले असून घरनिर्मिती कमी झाली आहे. त्यामुळे नव्याने आलेले व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी घरनिर्मितीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून तळोजा येथील गृहप्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

२०१९ पर्यंत ५५ हजार घरांचे लक्ष्य मायवॉन पद्धतीचा वापर मायवॉन पद्धतीमुळे भिंतीची उभारणीदेखील सिमेंट क्राँक्रीटने केली जात असून त्यात प्लास्टरचा उपयोग कमी प्रमाणात केला जात असतो. हे तंत्रज्ञान भूकंपरोधक तंत्रज्ञान असून ते मुळात जपानमधील तंत्रज्ञान आहे.

५५ हजार घरे घणसोली, तळोजा, पाचनंद या ठिकाणी  बांधण्याचे आश्वासन सिडकोने दिले आहे.