X

नवी मुंबईत आता नवा मानबिंदू

या प्रकल्पासाठी नियोजन विभागाने आम्रपाली मार्गावरील सात हेक्टर जमिनीची निवड केली आहे.

बेलापूरमध्ये सात हेक्टर भूखंडावर आकर्षक इमारती

आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क, अद्ययावत रेल्वे स्थानके उभारणारी सिडको आता शहराची एक वेगळी ओळख अधोरेखित करणाऱ्या वास्तू उभारण्याच्या प्रयत्नात आहे. बेलापूर येथील नवी मुंबई पालिकेच्या मुख्यालयाजवळ सात हेक्टर (सुमारे १८ एकर) भूखंडावर सिडको सिंगापूर, दुबई अथवा मलेशिया येथील मानबिंदूची (आयकॉनिक) निर्मिती करणाऱ्यास विकासकांना भूखंड देणार आहे. सिडकोने ही जमीन एखाद्या विकासकाला विकल्यास त्याचे सातशे ते आठशे कोटी रुपये मिळू शकणार आहेत मात्र या जमिनीचा विकास सिडकोचा आराखडय़ानुसार करावा लागणार आहे. या जमिनीवर उभा राहणारा प्रकल्प दोन हजार कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तम भविष्यकाळ असणाऱ्या नवी मुंबईची एक वेगळी ओळख सांगता येईल, अशी वास्तू किंवा जागा नाही. काही वर्षांपूर्वी सिडकोनेच बांधलेली रेल्वे स्थानके देशात कौतुकाचा विषय ठरली होती. त्यामुळे अनेक चाकरमनी व पर्यटक या स्थानकांना भेट देत. काही हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी या स्थानकांचा वापर करण्यात आला. पण आता या स्थानकांची झालेली दुरवस्था चर्चेचा विषय ठरलेली आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेने २०० कोटी रुपये खर्च करून तीन वर्षांपूर्वी बांधलेली बेलापूर सेक्टर १५ येथील मुख्यालयाची इमारत हाच शहराची मानबिंदू ठरली आहे. राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने रंगबेरंगी विद्युत रोषणाईने सजवलेली ही इमारत पाहण्यास व सेल्फी काढण्यास अनेक नवी मुंबईकर या इमारतीला भेट देतात. अशाच प्रकारे शहराची एक वेगळी ओळख तयार करणारी इमारत अथवा नगरी निर्माण करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी घेतला आहे.

या प्रकल्पासाठी नियोजन विभागाने आम्रपाली मार्गावरील सात हेक्टर जमिनीची निवड केली आहे. सेक्टर २७मधील भूखंड क्रमांक आठ हा सात हेक्टरचा असून यात असलेले एक खाडी तळे विकसित करता येण्यासारखे आहे. ही जमीन पूर्वी इंडियन एअरलाइन्सच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वसाहतीसाठी देण्यात आली होती. विधित कालावधीत या गृहप्रकल्प विकसित केला न गेल्याने सिडकोने ही जमीन पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. या जमिनीचा एकत्रित विकास करण्याचा एक आराखडा सिडकोने तयार केला आहे. त्या विकास आराखडय़ानुसारच एखादा विकासक हा प्रकल्प पूर्ण करणार असेल तर ही मोक्याची जमीन विकली जाणार आहे. या ठिकाणी आजचा जमिनीचा दर प्रति चौरस मीटर एक लाखापेक्षा जास्त आहे. त्यामुळे या जमीन विक्रीमधूनच सिडकोला सातशे ते आठशे कोटी रुपयांचा नफा मिळणार आहे मात्र जमीन खरेदी करणाऱ्या विकासकाला सिडकोने नमूद केलेल्या अटी व शर्तीवर आधारित हा प्रकल्प पूर्ण करावा लागणार आहे.

मुंबई-ठाण्याच्या धर्तीवर प्रकल्प

मुंबई-ठाण्यात बडय़ा विकासकांनी शासनाकडून जमिनी घेऊन आलिशान गृहप्रकल्प उभे केले आहेत. ते त्या शहरांचे मानबिंदू ठरत आहेत. त्याचप्रमाणे या जमिनीचा विकास केला जाणार आहे. यात वाणिज्यिक, निवासी आणि मनोरंजन अशा सर्व प्रकारची सोय राहणार आहे. सर्व इमारतींचा वाणिज्य वापर होणाऱ्या मलेशिया येथील ट्विन टॉवरसारख्या इमारतीची निर्मिती करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, मात्र ही वास्तू अथवा गृहप्रकल्प हा शहराचा मानिबदू ठरणारा असावा अशी सिडकोची अट आहे.

बेलापूर येथील सेक्टर २७ मधील सात हेक्टर जमिनीचा विकास हा करण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. शहराचा मानिबदू ठरणाऱ्या या जमिनीचा विकास सिडकोच्या नियोजन विभागाने निश्चित केलेल्या आराखडय़ानुसार करावा लागणार आहे.

रमेश डेंगळे, मुख्य नियोजनकार, सिडको

Outbrain