सर्वपक्षीय कृती समितीचा इशारा

नवी मुंबई : येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते खासदार दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने प्रकल्पग्रस्त बेलापुरात धडकले होते.

प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या मुख्यालयाला घेराव घालू नये यासाठी पोलिसांनी बुधवार पासून सिडकोकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची नाकाबंदी केली होती. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना सिडको मुख्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर पामबीच मार्गावर जाहीर सभा घेण्याची परवानगी देण्यात आली होती. १५ ऑगस्टपर्यंत दि.बा. पाटील नामकरण न झाल्यास विमानतळाचे काम बंद पाडण्याचा इशारा या सभेत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी दिला. त्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

सिडकोने एप्रिल महिन्यातील संचालक मंडळाच्या बैठकीत नियोजित नवी मुंबई विमानतळाचे बाळासाहेब ठाकरे नामकरण करण्याचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविला आहे. तेव्हापासून संतप्त प्रकल्पग्रस्तांनी दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. त्याला भाजप आणि आरपीआय या दोन पक्षांनी पांठिबा दिला आहे.

राज्य सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी १० जून रोजी प्रकल्पग्रस्तांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात मानवी साखळी आंदोलन केले होते. त्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने गुरुवारी घेराव आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.  मात्र, सिडको परिसरात पोलिसांनी बुधवार पासून केलेल्या नाकाबंदीमुळे हे घेराव आंदोलन न होता प्रकल्पग्रस्तांच्या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.

या सभेत माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, रमेश पाटील, मंदा म्हात्रे, राजू पाटील, रवींद्र चव्हाण, माजी खासदार संजीव नाईक, जगन्नाथ पाटील, हुसेन दलवाई यांनी विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह धरला.

प्रकल्पग्रस्तांनी केलेली दोन्ही आंदोलने ही शांतता मार्गाने केली आहेत पण यानंतरची आंदोलने ही शांततापूर्ण असणार नाहीत असा इशारा देखील या नेत्यांनी दिला आहे. पोलिसांनी या सभेत सहभागी होणाऱ्या सर्व नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

दुपारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी याची भेट घेऊन निवेदन  दिले. विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न देता त्या ऐवजी दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे असे या वेळीही स्पष्ट करण्यात आले आहे.

करोना अंतर नियमांचा विसर

’सिडको भवनला घेराव घालू नये यासाठी पोलिसांनी बेलापुरात येणारे सर्व रस्ते बंद केले होते. सिडको समोरूनच शीव पनवेल महामार्ग जातो.

’शीव पनवेल मार्गावर दिवसभरात लाखो वाहने धावतात तर सिडको परिसरात १५ ते २० हजार वाहने ये जा करीत असतात.

’ही सर्व वाहतूक थांबवून पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना घेरावापासून दूर ठेवले पण यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांना गुरुवारी मोठा वळसा घालून शिळफाटा मार्गे कळंबोलीला  जावे लागले.

’करोनाची साथ अद्याप असताना हजारोंचा जनसागर एकत्र आला होता. यावेळी करोना आरोग्य नियमांची पायमल्ली झाल्याचे सर्वत्र दिसून येत होते.

’आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेतली.