महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वेळकाढू धोरणाचा फटका

सिडकोने १४४ कोटी रुपये मंजूर करूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजेपी) कामाचा आराखडा आणि निविदा प्रक्रिया सुरू केली नसल्याने त्याचा फटका सिडको वसाहतीतील नागरिकांना बसत आहे. पाताळगंगा ते पनवेल अशा २५ किलोमीटर अंतरावर टाकलेल्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. हा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रत्येक महिन्याला शटडाऊन घेतला जात आहे. या  वेळकाढू प्रक्रियेमुळे सणासुदीच्या काळातही प्राधिकरणाच्या जलवाहिनीवर अवलंबून असलेल्या सिडको क्षेत्रातील रहिवाशांचा घसा कोरडा राहण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाने याबाबतचा अंदाजित खर्चाचा आराखडा बनविला नसल्याने सामान्यांच्या रोजच्या गरजेच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे सिडको प्रशासनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. नवीन जलवाहिनी आल्यास सिडको क्षेत्राला सुमारे ११५ एमएलडी पाणी मिळेल, तर पनवेल शहराला २० व जेएनपीटी परिसराला ४० एमएलडी पाणीपुरवठा होऊ शकेल. मात्र सामान्यांच्या समस्येला कोणतेही प्राधान्य न दिल्याने पनवेलमध्ये तीन दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यासाठी अद्याप तीन दिवस लागतील.

जलनामा

* टाटा पॉवर येथून आलेल्या पाण्याचा साठा पाताळगंगा नदीतून बोकरवाडा येथून उचलून पनवेल परिसरात पोहचवणे हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे काम आहे. सुमारे दीड कोटी रुपये पाणीपुरवठय़ाच्या माध्यमातून  प्राधिकरणाच्या तिजोरीत जमा होतात. याच पद्धतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पनवेल शहर आणि जेएनपीटीला पाणीपुरवठा करते.

* सिडको प्रशासनाकडे पाणी आल्यानंतर नवीन पनवेल, काळुंद्रे, खांदेश्वर, कळंबोली या वसाहतींमध्ये पाणीपुरवठा केला जातो. मात्र जीर्ण जलवाहिनीचा व्यास ७ मिलिमीटर जाडीवरून दोन मिलिमीटरचा झाला आहे. त्यामुळे ही जलवाहिनी ठिकठिकाणी फुटते. सिडको प्रशासनासोबत प्राधिकरण प्रशासनाने केलेल्या करारामध्ये ८५ एमएलडी पाणी देण्याचे मान्य करूनही ६७ एमएलडी पाणी देत असल्याने विविध सिडको वसाहतींना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

* पाण्याची मागणी व पुरवठा लक्षात घेऊन २५ किलोमीटर लांबीची १३२० मिमी.व्यासाची ही जलवाहिनी प्राधिकरणाने बदलावी यासाठी १४४ कोटी रुपये मंजूर केले; मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाने संबंधित जलवाहिनी बदलण्याची निविदा प्रसिद्ध केली नाही.