जलवाहिनीतील गळती दुरुस्तीचे काम लांबले; प्राधिकरणाकडून वारंवार पाणीपुरवठा बंद

पनवेल : जलवाहिनी दुरुस्तीसाठी सोमवारपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) ३६ तासांसाठी घेण्यात आलेला ‘शटडाऊन’ बुधवारी सायंकाळपर्यंत कायम राहिल्याने सिडको वसाहतींमधील घरांमध्ये ‘निर्जळी’ होती. बुधवारी पहाटे अनेक वसाहतींमध्ये पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावपळ सुरू झाली.

दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याने अनेक गृहसंस्थांनी पाण्याचे नियोजन केले होते, मात्र तिसऱ्या दिवशी पाणी न आल्याने अनेकांची गैरसोय झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) रसायनी येथील पाताळगंगा नदीवरून पनवेलमधील सिडको वसाहतींपर्यंत जलवाहिनीने पाणीपुरवठा करते. सिडकोला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एमजेपीची आहे. एमजेपीने पाणीपुरवठा केल्यानंतर नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, काळुंद्रे, नावडे या सिडको वसाहतींमधील अंतर्गत जलवाहिनीतून गृहसंकुले, गृहसंस्था आणि इतर भागांना पाणीपुरवठा केला जातो. ही जबाबदारी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाची आहे.

सिडको क्षेत्राला सुमारे दीडशे दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र जीर्ण जलवाहिनीमधील गळतीमुळे दीडशे दशलक्ष पाण्याचे लक्ष्य ‘एमजेपी’ला पूर्ण करता येत नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्तीची कामे हाती घेऊन जलवाहिनी, जलशुद्धीकरण केंद्र, मोटारपंप केंद्र यांतील दुरुस्तीचे कामे केली जातात.

सोमवारी जाहीर नोटीसद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. सोमवारपासून ३६ तास पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी पाण्याचे नियोजन करण्याचे सिडकोने कळविले होते. मात्र मंगळवारी रात्री होणारा पाणीपुरवठा झालाच नाही. अनेकांचा बुधवार पाण्याविनाच गेला. अनेक गृहसंस्थांचे जलकुंभ रिकामी झाले होते. काहींनी टँकरच्या माध्यमातून पाणी मागवले.

पालिकेकडून टँकरने पाणी

बुधवार सकाळपासून पाणी नसल्याने कळंबोलीतील अनेक रहिवाशांनी उद्यान आणि विद्यालयांकडे धाव घेतली. न्यू इंग्लिश स्कूलमधील विंधणविहीरीतून पाणी वाटप करण्यात आले, मात्र खाऱ्या पाण्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल पालिकेतील नगरसेवक सतीश पाटील यांनी थेट पनवेल पालिका मुख्यालय गाठले. पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन पालिकेने पहिल्यांदाच सिडको वसाहतीत टँकरने पाणी पुरवठा केला.

आज रात्री पाणी

एमजेपीने ‘शटडाऊन’ची वेळ अजून काही तासांनी वाढविल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही, अशी माहिती सिडको मंडळाचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन दलाल यांनी दिली. मात्र ‘एमजेपी’ने बुधवारी दुपारी पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर सिडको क्षेत्रात गुरुवारी रात्रीच पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत.