आठ हजार घरांची पुढील महिन्यात सोडत; २०२०पर्यंत बांधकाम पूर्ण

गेली दोन वर्षे एकाही नव्या घराची विक्री न केलेली सिडको पुढील वर्षांत आठ हजार ३५० घरांची गृहपर्वणी उपलब्ध करून देणार आहे. केंद्र सरकारच्या ‘सर्वासाठी घरे २०२२’ या योजनेला बळकटी देण्यासाठी सिडको मार्च २०२१ पर्यंत पाच टप्प्यांत ५२ हजार ४७ घरांची निर्मिती करणार असून त्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या ५२ हजार घरांतील ३५ टक्के घरे ही आर्थिकदृष्टय़ा दुर्बल नागरिकांसाठी राखीव असून शिल्लक ६५ घरे ही अल्प उत्पन्न गटांतील ग्राहकांना विकली जाणार आहेत. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या या घरांची किंमत लवकरच सिडकोचा अर्थ विभाग निश्चित करणार आहे.

सिडको लवकरच म्हाडापेक्षा मोठी गृहसोडत काढणार आहे. खारघर येथे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी सिडकोने साकारलेल्या वास्तुविहार आणि स्वप्नपूर्ती व उलवा येथे उन्नती गृहसंकुलांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर सिडको तळोजा, कळंबोली, घणसोली या भागांत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी १५ हजार घरांची योजना हाती घेत आहे. यातील चार हजार २७५ घरे झपाटय़ाने विकसित होणाऱ्या द्रोणागिरी क्षेत्रात आहेत. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटासाठी ३०७ चौरस फुटांचे घर बांधण्यात येणार आहे. अल्प उत्पन्न गटासाठी हे क्षेत्रफळ ३७० चौरस फूट आहे. सप्टेंबरपासून बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि. या बांधकाम कंपनीने खारघर येथे घरे बांधण्यास सुरुवात केली आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत ही १५ हजार १५२ घरे तयार होणार आहेत. त्यांची सोडत पुढील महिन्यात सिडको काढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सिडकोच्या अभियंता विभागाने या घरांच्या उभारणीसाठी होणारा एकूण खर्च काढल्यानंतर अर्थ विभाग त्यांचे दर निश्चित करून ही घरे विक्रीसाठी पणन विभागाकडे सुपूर्द करणार आहे. ही प्रक्रिया येत्या महिन्याभरात पूर्ण होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या घरांच्या किमतीबाबत आत्ताच निश्चित सांगता येणार नाही, पण ही सर्व घरे परवडणाऱ्या घरांच्या व्याख्येत बसविण्यात येत असल्याने त्यांची किंमत २० लाखांपर्यंत असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटातील घरे पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करण्यात आली असून त्यांना महारेराच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. महारेराची मंजुरी मिळाल्यानंतरच या घरांची विक्री केली जाणार आहे. सिडकोच्या घरांनाही महारेराची मंजुरी सक्तीची झाली असल्याने या योजनेच्या सोडतीला विलंब झाला आहे. पहिल्या टप्प्यात १५ हजार १५२ घरे बांधली जाणार असून त्यांची मुदत मार्च २०२० पर्यंत आहे, तर दुसऱ्या टप्प्यात सात हजार ५७६ घरांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ही घरेदेखील याच काळात तयार होणार आहेत. उर्वरित टप्पे एकाच वेळी तयार होणार असून यात २९ हजार ३१९ घरे बांधण्यात येणार आहेत. एप्रिल महिन्यात कामांना सुरुवात होणार असून मार्च २०२१ मध्ये त्यांचे बांधकाम पूर्ण होणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘सर्वासाठी घरे’ या योजनेत राज्यात सिडकोचा वाटा मोठा असणार आहे. येत्या चार वर्षांत ५२ हजार घरे बांधण्याचे उद्दिष्ट सिडकोने ठेवले आहे. सिडकोच्या या योजनेमुळे घरांचे दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बडय़ा विकासकांनीही परवडणाऱ्या घरांकडे मोर्चा वळविला आहे. सिडकोच्या गृह योजनेमुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पुढील वर्षी या घरांची सोडत काढली जाणार आहे.    – भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको