दुसऱ्या महागृहनिर्मितीची डिसेंबरमध्ये लॉटरी? पंतप्रधान आवास योजनेसाठी आणखी साडेआठ हजार घरे

नवी मुंबई सिडकोच्या वतीने ऑगस्ट महिन्यात काढण्यात आलेल्या पंधरा हजार घरांच्या विक्रीला प्रतिसाद मिळाल्यानंतर सिडकोने आणखी २५ हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारपणे डिसेंबरमध्ये जाहीर होणाऱ्या दुसऱ्या महागृहनिर्मितीत साडेआठ हजार घरे पंतप्रधान आवास योजनेसाठी राखीव ठेवली जाणार आहेत. ही सर्व घरे तळोजा नोडमध्ये बांधली जाणार आहेत.

केंद्र सरकारने २०२२ पर्यंत सर्वासाठी घरे ही योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने वीस लाख घरे बांधण्याचे लक्ष ठेवले आहे. यात सिडको व म्हाडावर परवडणारी घरे बांधण्याची मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. येत्या काळात सिडकोने महामुंबई क्षेत्रात खासगी विकासकासह पाच लाख घरे बांधावीत असे अपेक्षित आहेत. त्यातील ५२ हजार घरांचा आराखडा माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी तयार केलेला आहे. या महागृहनिर्मितीवर विद्यमान व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी लक्ष केंद्रित केले असून पहिल्या महिन्यातच पंधरा हजार घरांची सोडत काढण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले होते. बांधकाम आणि विक्री प्रक्रिया एकाच वेळी केली जात आहे. त्यानुसार खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी आणि घणसोली येथे घरे बांधली जात असतानाच त्याची २ ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात आली आहे. यात ११०० ग्राहक वगळता सर्व ग्राहकांना घरे मिळाली आहेत. ही प्रक्रिया सुरू असतानाच सिडकोच्या नियोजन विभागाने तळोजा नोडमध्ये आणखी २५ हजार घरांचा आराखडा तयार केला आहे. येत्या महिन्यात त्यांची बांधकाम निविदा पार पडल्यानंतर लागलीच सोडत काढली जाणार आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ही स्वप्नपूर्ती करण्याचे आदेश राज्य सरकारने सिडकोला दिलेले आहेत. त्यामुळे डिसेंबरमध्ये सिडकोच्या आणखी २५ हजार घरांच्या सोडत निघण्याची शक्यता आहे. नुकत्याच काढण्यात आलेल्या १५ हजार घरांसाठी १ लाख ९१ हजार मागणी अर्ज आले होते. त्यामुळे सिडकोच्या घरांना आजही मोठी मागणी असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. मंदीच्या या काळात त्या संधीचा फायदा उचलण्याचे प्रशासनाने ठरविले असून २५ हजार घरांच्या बांधकामाची निविदा अंतिम टप्प्यात आहे. यातील ३५ टक्के अर्थात साडेआठ हजार घरे ही आर्थिक दृष्टय़ा दुर्बल घटकासाठी राखीव ठेवली जाणार आहेत. ही सर्व घरे पंतप्रधान आवास योजनेसाठी आहेत. सिडकोसमोर येत्या चार वर्षांत ५२ हजार घरांचे लक्ष असून यातील ४० हजार घरांचा टप्पा याच वर्षी पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाचे सिडकोचे वर्षे महागृहनिर्मितीचे असल्याचे दिसून येते.

सिडकोच्या दुसऱ्या महागृहनिर्मितीसाठी जागेच्या शोध पूर्ण झालेला आहे. तळोजा नोडमध्येच ही निर्मिती केली जाणार आहे. त्याची संख्या आता निश्चित सांगता येणार नाही पण पंतप्रधान आवास योजनेसाठी जादा वाढीव चटई निर्देशाकं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गृहनिर्मिती होणार आहे. येत्या महिन्याभरात या प्रकल्पासाठी स्वारस्य देकार मागविण्यात येणार आहेत.

– के. के. वरखेडकर,, मुख्य अभियंता, सिडको, नवी मुंबई</strong>