नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मोठय़ा प्रमाणात लागणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्तांमधून उपलब्ध व्हावा यासाठी सिडको येत्या काळात पनवेल व उरण येथे विमान व बंदर अकादमी सुरू करणार असल्याची माहिती सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही राधा यांनी दिली. विमानतळाचे पहिले उड्डाणऑक्टोबर २०१९ पर्यंत करण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने सिडकोने तयारी सुरू केली असून जून २०१६ रोजी कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. या प्रक्रियेची निविदा पुढील महिन्यात काढली जाणार आहे.

पनवेल तालुक्यातील १४ गावांशेजारील जमीन संपादन करून सिडको आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ निर्माण करण्याच्या कामास लागली आहे. त्यासाठी लागणाऱ्या दोन हजार ६८ हेक्टर जमिनीचे संपादन जवळजवळ पूर्ण झाले असून एक हजार १६० हेक्टर जमिनीवर प्रत्यक्ष विमानतळ उभारले जाणार आहे.
प्रकल्पग्रस्तांचे अ‍ॅवार्ड देण्याचे काम सध्या सुरू असून त्यांना पुष्पकनगरमध्ये भूखंड दिले जाणार आहेत. या विमानतळावरून वर्षांला साठ कोटी प्रवासी प्रवास करतील असा कयास आहे. इतक्या जवळ दोन विमानतळ कार्यान्वित होण्याची ही देशातील पहिलीच घटना असेल.
या विमानतळासाठी लागणाऱ्या वैमानिक व हवाईसुंदरीपेक्षा तांत्रिक, केबिन क्रू आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप मोठा कर्मचारीवर्ग लागणार असून सिडकोच्या सर्वेक्षणानुसार ही संख्या दोन लाख आहे. त्यामुळे सिडकोने ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या आहेत त्या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांसाठी सिडको पनवेल परिसरात विमान अकादमी सुरू करणार आहे. त्याचप्रमाणे उरणमध्ये जेएनपीटीच्या माध्यमातून चौथ्या टर्मिनलचे काम सुरू झाले असल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणात रोजगार उभा राहणार आहे. सिडकोने जेएनपीटी प्रभावित क्षेत्राचाही विकास सुरू केला आहे. या टर्मिनल्ससाठी मोठय़ा प्रमाणात ट्रक वाहतूक व गोदाम लागणार असून अनेक कर्मचाऱ्यांचीही गरज भासेल.
त्यामुळे उरण परिसरात सिडको बंदर अकादमी सुरू करणार असल्याची माहिती राधा यांनी मंगळवारी पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत दिली.