सिडकोकडून आठ दिवसांची अखेरची संधी; हप्ता न भरणा ऱ्या ग्राहकांची संख्या एक हजार ७२६

नवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्मितीत भाग्यवंत ठरलेल्या ग्राहकांपैकी घरांचा एकही हप्ता न भरणा ऱ्या ग्राहकांचे सोडतीत मिळालेले घर रद्द करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. हे घर रद्द करण्यापूर्वी सिडकोने त्या ग्राहकांना आठ दिवसांची आणखी मुदत दिली असून सहा नोव्हेंबरपर्यंत या ग्राहकांनी घरांचे काही हप्ते भरून आपण घर घेण्याची इच्छा कायम ठेवण्याची संधी सिडकोने दिली आहे. दोन वर्षांत एकही हप्ता न भरणारे एक हजार ७२६ ग्राहक आहेत.

दोन वर्षांपूर्वी सिडकोने १४ हजार ८३८ घरांची सोडत काढली तर गेल्या वर्षी ९ हजार २४९ घरे विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. या दोन्ही सोडतींत २४ हजार ग्राहक लाभार्थी ठरले आहेत. यातील अनेक ग्राहक हे कागदपत्र छाननीमध्ये अपात्र ठरले आहेत. ही संख्या आता सहा ते सात हजारांच्या घरात जात आहे. सिडकोचे घर आरक्षित करताना २५ ते ५० हजारांची अनामत रक्कम स्वीकारली जाते. काही ग्राहक ही रक्कम अदा करून सिडकोचे घर आरक्षण करीत असल्याने ही संख्या लाखोंच्या घरात जात आहे. यातील अनेक ग्राहकांना नंतर घराची रक्कम भरण्याचे गणित जुळवता येत नाही. त्यात यंदा करोना साथ रोगाने अनेक ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. काही ग्राहकांचे रोजगार गेले आहेत तर काही जणांच्या वेतनात कपात झाली आहे. त्यामुळे सिडकोच्या मिळालेल्या घरावर पाणी सोडण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. यात करोना साथ सुरू होण्यापूर्वीपासून एकही हप्ता न भरण ऱ्या ग्राहकांना सिडकोने शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सहा नोव्हेंबरपर्यंत या ग्राहकांनी घर घेण्यास इच्छुक अथवा हप्ते न भरल्यास त्यानंतर त्यांचे घर रद्द करून ते पुढील संगणकीय सोडतीत दुस ऱ्या इच्छुक ग्राहकांना विकले जाणार आहे.

तीन वेळा मुदतवाढ

करोन साथ रोगकाळात निर्माण झालेली आर्थिक समस्या लक्षात घेऊन सिडकोने प्रथम ३० जूननंतर २९ सप्टेंबर आणि आता २८ डिसेंबर अशा तीन मुदतवाढ जाहीर केलेल्या आहेत. सिडकोची घरे शिल्लक ठेवून तोटा सहन करण्यापेक्षा त्यांच्या विक्रीचा तात्काळ निर्णय घेण्यात यावा असे आदेश व्यवस्थापैकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिले आहेत.