कळंबोली, नावडे आणि कामोठेसाठी २५ वर्षे अविरत सेवा

मलनिस्सारण वाहिनी तुंबल्यानंतर हवेच्या दबावाने त्या स्वच्छ करणारा कामोठे, कळंबोली आणि नावडे या परिसरांसाठीचा एकच दाबयंत्र टँकर गेली २५ वर्षे राबत आहे. या टँकरने आता जवळजवळ मान टाकली आहे. त्यामुळे उन्हाळा आणि पावसाळ्यात मलवाहिन्या साफ करण्याची क्षमता संपलेली आहे. विशेष म्हणजे त्याऐवजी नवीन दाबयंत्र टँकर देण्याची तयारी सिडको प्रशासनाने दाखवलेली नाही. त्यामुळे बुधवारी अधिकाऱ्यांनी रहिवाशांसमोर प्रशासन दुर्लक्षाची व्यथा मांडली.

नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे व नावडे यांसारख्या वसाहतींमध्ये पावसाळ्यात मलनिस्सारण वाहिनी तुंबण्याच्या अनेक घटना घडतात. कळंबोली वसाहत ही सिडकोच्या दुर्लक्षित आणि भ्रष्ट कारभारामुळे समुद्रसपाटीपेक्षा दहा फूट खोल वसविल्याने येथे उन्हाळ्यात मल वाहून नेणाऱ्या वाहिन्या तुंबतात. पावसाळ्यात तर शौचालयांमधून थेट मलाचे पाणी घरात शिरते. पावसाचे प्रमाण वाढल्यास संपूर्ण मल घरभर पसरतो. बुधवारी के. एल. वनमधील रहिवाशांनी या रोजच्या संकटातून सोडविण्यासाठी सिडको कार्यालयात धाव घेतली. परंतु येथे आल्यानंतर सिडको अधिकाऱ्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी प्रतिसाद देत नसल्याची बाब रहिवाशांच्या ध्यानात आली. २५ वर्षांपूर्वीची कालबाह्य़ झालेल्या दाबयंत्राचा टँकर मागणी करूनही नवीन आणला जात नसल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्याने सांगितले. विशेष म्हणजे या टँकरवर आजही सिडको महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली आहे.