आर्थिक मंदीची सर्वाधिक झळ बांधकाम क्षेत्राला बसलेली असताना सिडकोने पाम बीच मार्गालगत नेरुळ- सानपाडा येथील विक्रीला काढलेल्या चार भूखंडांपैकी एका भूखंडाला तीन लाख ३९ हजार ३३९ रुपये प्रति चौरस मीटरचा दर प्राप्त झाला आहे. या चार भूखंडांच्या विक्रीतून सिडकोला ३१९ कोटी रुपये मिळणार आहेत. काही महिन्यांपूर्वी खारघर येथील दोन भूखंड विकासकांनी सिडकोला परत केले होते. या पाश्र्वभूमीवर एका भूखंडाला मिळालेला हा दर आशादायक आहे.
नवी मुंबई पालिका क्षेत्रात सिडकोकडे आता जमीन कमी शिल्लक राहिलेली आहे. त्यामुळे सिडकोने मागील महिन्यात काढलेल्या भूखंड विक्रीला चांगला प्रतिसाद मिळालेला असून सानपाडा येथील भूखंड क्रमांक सात अ साठी निवास्ती डेव्हलपर्स या विकासकाने ३ लाख ३९ हजार ३३९ प्रति चौरस मीटर उच्चतम निविदा दाखल केली आहे. याच भूखंडाच्या जवळील दुसऱ्या भूखंडाला तीन लाख ७ हजार ५५५ रुपये दर अक्षर रियाल्टर यांनी दिलेला आहे. सानपाडा नोडजवळील नेरुळ भागातील सेक्टर १३ मधील भूखंड क्रमांक सात ब साठी एक लाख ७३ हजार ३०० रुपये, तर सात अ साठी एक लाख ६४ हजार प्रति चौरस मीटर दर प्राप्त झाल्याने बांधकाम क्षेत्रात हलचल निर्माण झाली आहे. यासाठी ३७ विकासकांनी निविदा भरल्या होत्या. नवी मुंबई विमानतळ, मेट्रो, जेएनपीटी विस्तार, न्हावा शेवा सी लिंक, नैना विकास या बडय़ा प्रकल्पामुळे महामुंबई क्षेत्रातील जमिनींना आजही सोन्याचा भाव असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. चढय़ा दराने घेतलेल्या भूखंडांमुळे या ठिकाणी तयार होणारी घरे ही कोटीच्या कोटी उड्डाणे घेणार असल्याचे दिसून येते.