|| विकास महाडिक

मतदान बहिष्काराच्या इशाऱ्यानंतर सिडकोला जाग; नवी मुंबई पालिकेचा मदतीचा हात :- पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारण्याच्या तयारीत असलेल्या खारघरवासियांची तहान भागविण्यासाठी सिडकोने नवी मुंबई पालिकेला साकडे घातले आहे. त्यामुळे पालिकेने गुरुवारपासून पाच दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या खारघरवासियांनी तर ‘पाणी नाहीतर मतदान नाही’ असे फलक गृहसंस्थांच्या बाहेर लावले होते.

मतदारांच्या निषेधाचा धसका घेत हा निर्णय घेतल्याचे कळते.

पावसाळा जवळजवळ संपत चालला आहे. खारघरमधील काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे येथील नागरीक हैराण आहेत. सिडकोच्या वतीने या क्षेत्रासाठी पाणी पुरवठा केला जात आहे. हेटवणे धरणातून येणारे  पाणी  गळतीमुळे अनेकांच्या घरापर्यंत पोहचत नाही. पावसाळ्यात या रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. याचवेळी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने येथील रहिवाशांनी उमेदवारांना जाब विचारण्यास सुरुवात केली. ज्या गृहसंस्थांमध्ये पाणी येत नाही, तेथील रहिवाशांनी पाणी नाही तर मत नाही, असे थेट फलक लावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा एक आठवडय़ापूर्वी खारघरमध्ये ठरली. त्यामुळे स्थानिक पातळीवरील हा मुद्दा थेट पंतप्रधानांच्या कानावर घालावा, याची तयारी येथील रहिवाशांनी केली. पोलिसांना ही कुणकुण लागल्यावर त्यांनी या आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी  धरपकड सुरू केली, मात्र तेव्हापासून पाणीटंचाईवर मात करण्याची सूत्र फिरु लागली. आमदार आणि सिडकोचे अध्यक्ष असलेले महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना ही गंभीर समस्या सोडविण्याचे साकडे घातले.

चंद्र यांनी नवी मुंबई पालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना मोरबे धरणाचे अतिरिक्त पाणी देण्याची मागणी केली. मिसाळ यांनी खारघरसाठी पाच दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी देण्याचे आदेश जारी केले. सिडकोच्या खारघर, कामोठे या भागाला नवी मुंबई पालिका यापूर्वीच ३५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा करीत आहे. त्यात आणखी पाच दशलक्ष लीटरची भर पडणार असल्याने हा पुरवठा ४० दशलक्ष लीटर होणार आहे.  मोरबे धरणाचे पाणी काही काळ मिळणार आहे मात्र उन्हाळ्यात ही मदत करताना पालिका हात आखडता घेत असल्याचा अनुभव आहे. नवी मुंबई पालिकेचे नगरसेवक पनवेल क्षेत्राला अतिरिक्त पाणी पुरवठा देण्यास विरोध करीत असल्याचे दिसून आले आहे.

पक्षांतराचा असाही फायदा?

नवी मुंबई पालिकेसाठी असलेल्या मोरबे धरणातून खारघर आणि पनवेल पाणी मिळावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.मात्र नवी मुंबई पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असल्याने ही मागणी आजवर फळास आलेली नव्हती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधी काही दिवस नवी मुंबईतील मातब्बर नेते गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत नवी मुंबई पालिकेतील बहुतांश नगरसेवक भाजपमध्ये गेले. त्यामुळे आता भाजपची पनवेल महापालिका आणि सिडकोचे अध्यक्ष भाजपचे आमदार असल्याने पाण्याची समस्या सुटली.

खारघर भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यासाठी दीर्घ व लघु उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. सिडकोच्या जलवाहिन्यातून हा पाणी पुरवठा कमी होत असल्याने सिडको ही पूर्तता करणार आहे. सद्यस्थितीवर मात करण्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या मोरबे धरणातून पाणी मागण्यात आले आहे. -प्रशांत ठाकूर, अध्यक्ष, सिडको

शहर सिडकोने वसविल्याने सर्वच पालिकांना मंडळ मोठय़ा भावासारखे  आहे. व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मागणीनुसार खारघरवासियांसाठी पाच दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी देण्याचा निर्णय झाला. -अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई पालिका