कायमस्वरूपी सदस्यत्व न दिल्यामुळे वाद चिघळण्याची चिन्हे

सिडकोच्या कर्मचाऱ्यांना सदस्यत्व न दिल्यास ‘नवी मुंबई स्पोर्ट्स असोशिएशन’ने ‘फिफा’ फुटबॉल स्पर्धेसाठी बांधलेले मैदान काढून घेण्याचा इशारा सिडकोने दिल्यानंतर सिडको कर्मचाऱ्यांना सेवेत असेपर्यंत सदस्यत्व देण्याची तयारी एनएमएसएने दर्शवली आहे. १०० कर्मचाऱ्यांच्या सदस्यत्वासाठी दोन हजार फुटबॉलपटूंचे नुकसान करणार का, असा सवाल क्रीडा संकुलाने केला आहे. त्यामुळे सिडको आणि एनएमएसए यांचा हा वाद विकोपाला पोहोण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सिडकोने ३५ वर्षांपूर्वी नवी मुंबई स्पोर्ट्स असोशिएशनला सवलतीच्या दरात वाशीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी २० एकरांचा भूखंड दिला आहे. या भूखंडाचा करारनामा करताना सिडकोने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात सदस्यत्व देण्यात यावे, असा नियम नमूद केला आहे. एनएमएसएमध्ये आता जवळपास साडेनऊ हजार सदस्य आहेत. विविध खेळांच्या विकासासाठी एनएमएसए कोटय़वधी रुपये खर्च करत आहे. त्यामुळे संस्थेने सदस्य शुल्क थेट पाच लाख रुपये केलेले आहे. एक हजार रुपये सदस्य शुल्काने सुरू  झालेल्या या क्रीडा संकुलाचे सदस्यत्व पाच लाख रुपयापर्यंत गेल्याने सिडको कर्मचाऱ्यांना ते देणे शक्य होत नाही. त्यांना २५ ते ५० हजार रुपयांत सदस्यत्व द्यावे, अशी मागणी सिडकोने केली आहे. क्रीडा संकुलाने ही मागणी फेटाळून लावली आहे. पाच लाख रुपयांत ५० टक्के सवलत दिली तरी ही रक्कम कर्मचारी भरू शकणार नाहीत, असे सिडको कर्मचारी संघटनेचे मत आहे. एनएमएसए सिडको कर्मचाऱ्यांना सदस्यत्व देत नसल्याने सिडकोने फिफासाठी चार कोटी रुपये खर्च करून बांधलेले फुटबॉल मैदान काढून घेण्याची नोटीस क्रीडा संकुलाला बजावली आहे. २५ ऑक्टोबरला ही मुदत संपली आहे. सिडकोने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही पण कारवाईची टांगती तलवार एनएमएसएवर आहे. या मैदान उभारणीत फिफा सर्वप्रथम ५० टक्के खर्च उचलणार होती पण त्यांनी नंतर हात वर केले. त्यामुळे एनएमएसएवर हा आर्थिक बोजा पडला. त्यात सिडको हे मैदान काढून घेण्याची नोटीस बजावत असल्याने सदस्य संताप व्यक्त करत आहेत. १०० कर्मचाऱ्यांना सदस्यत्व न दिल्याने सिडकोने मैदान मोकळे करण्याची नोटीस बजावली आहे, पण याच मैदानावर सध्या दोन हजार खेळाडू फुटबॉल सराव करीत आहेत. क्रीडा संकुलाला आज ना उद्या अशा प्रकारचे मैदान उभारावे लागणार होते. यासाठी सर्व सदस्यांकडून अतिरिक्त तीन हजार रुपये शुल्क वसूल करण्यात आलेले आहे.

सिडकोने अद्याप कारवाई केलेली नाही. त्यांच्या नोटिसला आम्ही उत्तर दिलेले आहे. एनएमएसएने कोणत्याही करारनाम्यातील नियमाचा भंग केलेला नाही. एनएमएसए सिडको कर्मचाऱ्यांना सेवा सदस्यत्व (सेवेत असेपर्यंत) देण्यास तयार आहे पण त्यांना ते मान्य नाही. काही कर्मचाऱ्यांसाठी सिडको दोन हजार खेळाडूंवर अन्याय करणार आहे का, हा खरा प्रश्न आहे.

डॉ. दिलीप राणे, उपाध्यक्ष, नवी मुंबई स्पोर्ट्स असोशिएशन, वाशी