कळंबोली वसाहतीमध्ये ५० खाटांचे पहिले रुग्णालय बांधण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती सिडकोच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासाठी सिडको स्वत:च्या मालकीच्या राखीव भूखंडाची चाचपणी करणार आहे. यासाठी दोन भूखंडांची जागा निश्चित झाली आहे. रुग्णालयाची ही योजना सध्या कागदावर आहे.
कळंबोली वसाहतीची लोकसंख्या सव्वादोन लाखांवर पोहोचली आहे. येथील रहिवाशांना सरकारी दरात उपचार मिळावेत यासाठी सिडकोने दोन वर्षांपूर्वी सेक्टर ५ येथील समाज मंदिर येथे सरकारी दवाखान्यात आतापर्यंत सुमारे ७० हजार रुग्णांनी उपचार घेतले आहेत. रुग्णांचा प्रतिसाद पाहून कळंबोलीमधील विविध राजकीय पक्षांच्या आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सिडकोने स्वत:च्या मालकीचे रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली होती. त्यामुळे डिसेंबर महिन्यात सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक व्ही. राधा यांनी कळंबोली येथील समाज मंदिरामधून चालणाऱ्या दवाखान्याची पाहणी केली. कळंबोलीमध्ये सिडकोचे रुग्णालय व आरोग्य केंद्र सुरू करण्याबाबत सिडकोने सकारात्मक विचार केल्याचे या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. सेक्टर ७ व ८ येथे सिडकोचे आरोग्याच्या कामासाठी राखीव भूखंड असून येथे ५० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी सिडको प्रयत्नशील आहे. महिला प्रसूतीपासून विविध शस्त्रक्रिया करण्याची सोय या रुग्णालयात सिडको करणार आहे. सामान्य आजारांसह, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बाह्य़ रुग्ण सेवेसह इतर सोयी येथे उपलब्ध असणार आहेत. रुग्णालय सुरू केल्यास सुपरस्पेशालिटी रुग्णालयापेक्षा प्रस्तावित रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णसंख्या मोठी असेल. याबाबत सिडकोचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बावस्कर यांनी अद्याप या प्रस्तावाचे काम सुरू असल्याचे सांगितले.