तिघांना अटक; बनावट कागदपत्र बनवून फसवणूक

सिडकोचे साडेबारा टक्के योजनेचे भूखंड लाटण्यासाठी मयत व्यक्तीच्या नावावर बनावट कागदपत्र बनवून करोडो रुपयांची लूट करणाऱ्या तीन जणांना नवी मुंबई पोलिसांनी मकोका अंतर्गत अटक केली आहे. या भूखंड घोटाळ्यात मोठी टोळी सक्रिय असून सिडकोच्या अधिकाऱ्यांचा या गुन्ह्यात समावेश असल्याने पोलीस या अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहे.

बेलापूरमध्ये मयत व्यक्तीच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून तीन जणांनी दोन कोटी रुपयांचा भूखंड हडपल्यावर ही घटना उघडकीस आली. अशा प्रकारे १३ गुन्ह्य़ात ही टोळी सक्रिय आहे.

प्रभाकर म्हात्रे (वय ५३), लवेश जाधव(३९), नरेंद्र बारवडिया (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर चौथ्या आरोपीचा यापूर्वीच मृत्यू झालेला आहे. आरोपींनी बेलापूर गावातील भूखंड क्रमांक ३९८, ३९९ ,४००, ४०१ असे एकूण ६९४ चौरस मीटरचा भूखंड दिनेश पटेल यांना विकला. वास्तविक या भूखंडाची मालकी सिडकोकडे असली तरी मयत शेतकरी जोमा बुध्या मारोती यांच्या नावावर बनावट कागदपत्राचा आधार घेत करण्यात आला. याच कागदपत्रांचा आधार घेत पटेल यांना त्रिपक्षीय करार करून देण्यात आला. या व्यवहारापोटी १ कोटी ८६ लाख १२ हजार रुपये घेण्यात आले. या भूखंडावर बांधकाम करण्यासाठी सिडकोच्या विविध परवानग्या घेण्यासाठी पटेल हे सिडकोकडे गेल्यानंतर भूखंड सिडकोच्या नावे असून अद्याप कोणालाही देण्यात आला नसल्याचे उघड झाले. त्यामुळे पटेल यांनी या त्रिकुटा विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

यातील प्रभाकर म्हात्रे याच्यावर यापूर्वीची अशाच प्रकारचे ७ गुन्हे, लवेश यांच्या विरोधात ४ तर नरेंद्र याच्याविरोधात २ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पैकी ४ गुन्ह्यात आरोप पत्रही दाखल करण्यात आलेले आहे. यात अनेक अधिकारी वा दलालांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या आरोपींवर महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुन्हे करण्याची पद्धत

मोकळया भूखंडाचे वाटप झाले नसल्याची खात्री करून घेतली जात होती. त्यानंतर सदर जागेचे सिडकोची बनावट कागदपत्रे बनवली जात होती. त्यावर सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्याची सही, सिडकोचा शिक्का मारला जात होता. त्यावर एखाद्या मृत शेतकऱ्याच्या नावे हा भूखंड केला जात होता. त्यानंतर सावज शोधून त्याला भूखंड विकला जात असे.

गुन्ह्याचा आवाका मोठा असून फसवणूक झालेल्या लोकांची संख्याही वाढू शकते. याबाबत सिडकोलाही माहिती देण्यात आली आहे. तपासात सिडकोच्या अधिकाऱ्यांचा सहभाग शक्यता पाहता त्यांचीही चौकशी केली जाईल. – प्रवीण कुमार पाटील, उपायुक्त गुन्हे शाखा