नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळातील प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने साडेबावीस टक्के योजनेअंतर्गत भूखंड वितरण केले असून या भूखंडांची प्रकल्पग्रस्तांना घरबसल्या माहिती उपलब्ध व्हावी यासाठी एनएमआयएएस (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिस्टम) हे मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपद्वारे प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या भूखंडाची पूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. सिडकोने अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग केला आहे.नवी मुंबई विमानतळ हा सिडकोसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला अडसर ठरू पाहणाऱ्या दहा गावांतील प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने देशातील सर्वोत्तम पॅकेज दिले आहे. या पॅकेजद्वारे प्रकल्पग्रस्तांना साडेबावीस टक्के योजनेअंतर्गत भूखंड वितरण करण्यात आले असून अशा ७४३ भूखंडांची सोडत काढण्यात आली आहे. या सर्व भूखंडांची माहिती या अ‍ॅपवर टाकण्यात आली असून त्यासाठी वापर करणाऱ्याला प्रथम आपल्या नावाची नोंदणी करावी लागणार आहे. या प्रकल्पग्रस्तांना ९५ हेक्टर जमीन वितरित करण्यात आली आहे. या अ‍ॅपमध्ये दोन पर्याय ठेवण्यात आले असून जमीन संपादन केलेल्या प्रकल्पग्रस्तांची वेगळी आणि स्थलांतरित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची माहिती देणारे वेगळे पर्याय ठेवण्यात आले आहेत. दहा गावांतील सुमारे दोन हजार ४०० प्रकल्पग्रस्त स्थलांतरित होणार असून त्याची माहिती या अ‍ॅपद्वारे मिळणार आहे. या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या नवीन घरांसाठी ७३ हेक्टर जमीन वितरित करण्यात आली असून या दोन्ही प्रकारांतील प्रकल्पग्रस्तांची संपूर्ण माहिती या अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे.