नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी

 

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्त नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी आज गुरुवारी बेलापूर येथील सिडकोच्या मुख्यालयाला हजारोच्या संख्येने घेराव घालण्यासाठी प्रकल्पग्रस्त, भाजप, आरपीआयचे कार्यकर्ते एकवटणार आहेत.

हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी सिडको मुख्यालयाकडे येणाऱ्या चार मार्गांची बुधवारपासून नाकाबंदी केली आहे. त्यासाठी सात हजार पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. या भागात सर्व प्रकारच्या खासगी वाहतुकीला सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. हे आंदोलन सर्वपक्षीय असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, पण या सर्व आंदोलनाची धुरा ही ठाणे व रायगड जिल्ह्यातील भाजपकडे असल्याचे चित्र आहे. शिवसेनेला खिंडीत पकडण्यासाठी भाजपची रणनीती आहे.

दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी यापूर्वी १० जूनला सर्वपक्षीय कृती समितीने मानवी साखळी आंदोलन केले होते. त्याला ठाणे, पनवेल, कल्याण-डोंबिवली या भागांत चांगला प्रतिसाद लाभला होता. त्यानंतरही राज्य सरकारने दि.बां.च्या नावाबाबत विचार न केल्याने गुरुवारचे घेराव आंदोलन जाहीर करण्यात आले असून यासाठी एक लाख प्रकल्पग्रस्त व सर्वपक्षीय कार्यकर्ते बेलापूर येथे जमणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

वाहतुकीवर निर्बंध

पोलिसांनी बेलापूरच्या सिडको मुख्यालयाकडे येणारे सीबीडी महालक्ष्मी चौक, बेलापूर किल्ला, पार्क हॉटेल, पालिकेचे जुने मुख्यालय या चार मार्गांनी येणारे सर्व रस्ते अत्यावश्यक वाहनांव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केले आहेत.

मुंबईहून पुणे-गोव्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला ऐरोली, शिळफाटा मार्गे कळंबोलीला जावे लागणार असून त्यानंतर ही वाहने पुणे- गोव्याकडे जाऊ शकणार आहेत. तर पुण्याहून येणाऱ्या वाहनांना तळोजा येथील पुरुषार्थ पेट्रोलपंपापासून वळण घेऊन शिळफाटा मार्गे मुंबईत जावे लागणार आहे.

वाशी टोलनाक्यावरून येणारी सर्व वाहने ही शिळफाटा मार्गानेच ये-जा करू शकणार आहेत.  पोलिसांनी शीव-पनवेल मार्गावरील वाहतूक उरण फाटा ते खारघरपर्यंत बंद केली आहे. जड वाहनांना तर सकाळी आठ ते रात्रौ आठपर्यंत या भागात प्रवेशबंदी आहे.