|| विकास महाडिक

कर्ज घेऊन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर

नवी मुंबई : सिडकोच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या महागृहनिर्मितीतील सुमारे ११ हजार घरांचा ताबा जून अखेरपर्यंत दिला जाणार आहे. सिडकोने मागील दोन वर्षात २४ हजार घरांचे बांधकाम सुरू केले असून त्यांच्या दोन सोडती काढण्यात आल्या आहेत. काही ग्राहकांनी या घरांचे सर्व हप्ते देखील भरलेले आहेत. त्यामुळे स्वप्नातील घर कधी मिळणार या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना आता जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. करोनामुळे गेली वर्षेभर या घरांचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. सिडको ऑक्टोबर २०२० रोजी यातील पाच ते सहा हजार घरांचा ताबा देणार होती.

केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घर या योजनेची पूर्तता करताना सिडकोनेही ९५ हजार घरे बांधण्याची घोषणा केलेली होती. जागा, मागणी आणि आर्थिक गणितामुळे ही संख्या आता ६५ हजारापर्यंत कमी करण्यात आलेली आहे. या ६५ हजार घरांपैकी सुमारे २४ हजार घरांचे बांधकाम खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी, घणसोली या सिडको नोडमध्ये सुरू आहेत. या २४ हजार घरांपैकी ११ हजार घरांचा ताबा ऑक्टोबर २०२० पासून देण्यास सुरुवात केली

जाणार असल्याचे सिडकोने जाहीर केले होते. मात्र मार्चपासून सुरू झालेल्या करोना प्रार्दुभावामुळे या मुदतीत सिडको घरांचा ताबा देऊ शकलेली नाही. मार्च २०२१ मध्ये दुसऱ्या टप्यातील घरांचा ताबा दिला जाणार होता, मात्र आता दोन्ही टप्यातील ११ हजार घरांपैकी पहिल्या टप्यातील घरांचा ताबा पावसाळ्यापूर्वी दिला जाणार आहे. करोना काळातही काही ग्राहकांनी सिडकोचे सहा हप्ते भरण्याचा प्रयत्ना केला आहे. त्यांना लवकरात लवकर घराचा ताबा हवा आहे. कर्ज घेतलेल्या वित्त कंपन्यांचे हप्ते सुरू झाले असून भाड्याने राहणाऱ्या ग्राहकांना भाड्याचा दुहेरी भुर्दड सोसावा लागत आहे. त्यामुळे सिडकोच्या या दिरंगाईमुळे अनेक ग्राहकांचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. अनेक ग्राहकांना ऐन करोना काळात नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे तर काही जणांना वेतनकपातीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे सिडकोचे घर घ्यावे की नाही या संभ्रमात देखील काही ग्राहक आहेत.

लवकरच आणखी एक सोडत

सिडकोने या महागृहनिर्मितीकडे संपूर्ण लक्ष देण्यासाठी व्यवस्थापैकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी तीनपैकी एका सह व्यवस्थापैकीय संचालकांना या प्रकल्पाची सर्वस्वी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील सर्व त्रुटी सोडविल्या जात असून आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी कमीत कमी व्याज आकारणाऱ्या वित्त संस्थेकडून या प्रकल्पासाठी कर्ज घेतले जाणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारी जमिन, अभियंता वर्ग, कंत्राटदार, वित्त पुरवठा यांचे नियोजन केले गेले असून दोन टप्यातील घरांचा ताबा दिल्यानंतर सिडको येत्या काळात आणखी सोडत काढणार आहे. यापूर्वीच्या सोडतीमधील सहा ते सात हजार घरे शिल्लक राहिल्याने त्यांची विक्री पहिल्यांदा सिडकोच्या दृष्टीने महत्त्त्वाची आहे.

सिडकोने जास्तीत जास्त घरे बांधण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी एक नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असून मागणी तसा पुरवठा केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारा खर्च हा सिडको आता कर्ज स्वरुपात उभा करणार असून ६.४ इतक्या कमी टक्याने कर्ज देण्यास वित्तसंस्था तयार झालेल्या आहेत. त्यामुळे वित्त पुरवठ्यानंतर या प्रकल्पाला अधिक गती येणार आहे. गेल्या वर्षी देण्यात येणाऱ्या घरांचा ताबा येत्या जून पर्यंत देण्याचा सिडकोचा प्रयत्न राहणार आहे. -डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापैकीय संचालक, सिडको