सिडकोच्या दहा हजार घरांच्या महागृहनिर्मितीची सोडत बेलापूर येथील मुख्यालयाऐवजी आता नेरुळ येथील आगरी कोळी भवनात होणार आहे. ही सोडत लोकपाल उपायुक्त सुरेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून ही सोडत ऑनलाईन लाईव्ह केली जाणार आहे. महा गृहनिर्मितीतील ९ हजार२४९ आणि ‘स्वप्नपूर्ती’मधील तयार ८१४ घरांसाठी एकूण एक लाख दोन हजार ऑनलाइन अर्ज आले आहेत. यातील दुबार अर्ज बाद करण्यात आले आहेत.

महागृहनिर्मितीची सोडत  २६ नोव्हेंबरच्या संविधान दिनाच्या निमित्ताने होत आहे. यापूर्वी सिडकोने राष्ट्रीय दिनांचे औचित्य साधून सोडत काढलेल्या असल्याचे दिसून येते. याच दिवशी सिडको कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यालयातील सभागृहात संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने सिडको मालकीच्या नेरुळ येथील आगरी कोळी भवनात ही सोडत काढली जाणार आहे. त्याची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून २५ नोव्हेंबर रोजी या सोडतीची रंगीत तालीम पूर्ण केली जाणार आहे. गुरुवारी या सोडतीसाठी लागणारी डाटा तयारी पूर्ण करण्यात आली. सिडकोने एका आयटी संस्थेबरोबर तयार केलेल्या या डाटाशी कोणी छेडछाड केली आहे, का याची तपासणी करण्यात आली.

१ लाख २ हजार अर्ज

सिडकोच्या महागृहनिर्मितीतील पहिल्या टप्यात ९ हजार २४९ व व्हॅलीशिल्प मधील शिल्लक ८१४ घरांसाठी एकूण एक लाख दोन हजार अर्ज आले असून केवळ ८१४ तयार घरांसाठी २६ हजार ग्राहकांनी मागणी नोंदविली आहे. या योजनेत अल्प व आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी घरे असून पंतप्रधान आवास योजनेसाठी ३५ टक्के घरांचे आरक्षण ठेवण्यात आले आहे.