येत्या पाच वर्षांत पन्नास हजार घरबांधणीचे लक्ष्य ठेवलेल्या सिडकोने यानंतर घरांचे आरक्षण म्हाडाच्या धर्तीवर ऑनलाइन करण्याचा विचार सुरू केला आहे. ४ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणाऱ्या देशातील पहिल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सादरीकरणात या पन्नास हजार घरांचे चित्र मांडले जाणार आहे. नव्याने उभ्या राहणाऱ्या सिडकोच्या गृहनिर्माण वसाहती स्मार्ट सिटी या निकषात बसणाऱ्या असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे त्यांचा आराखडा त्याच पद्धतीने तयार केला जात आहे.
सिडकोने उलवा, खारघर, येथे नुकत्याच पाच हजार घरांच्या सोडती काढल्या आहेत. त्याचे आरक्षण संगणक सोडतीद्वारे केले गेले असून त्यासाठी सिडकोची मोठी यंत्रणा वापरली गेली आहे. सिडकोच्या अत्यल्प, अल्प, मध्यम, उच्च उत्पन्न वर्गातील घरांसाठी आजही मोठय़ा प्रमाणात ग्राहकांच्या उडय़ा पडत असल्याचे दिसून आले आहे. सिडकोच्या घरांचे अर्ज मिळावेत यासाठी रात्रभर जागून रांग लावली जात असल्याचे आढळून आले आहे. गेली अनेक वर्षे सिडको संगणक पद्धतीने सोडत काढत असली तरी यापूर्वी केवळ मानवी लॉटरीद्वारे ही घरे दिली जात होती. त्यामुळे सिडकोने उभारलेल्या १४ नोडमध्ये सुमारे सव्वा लाख घरे आतापर्यंत ग्राहकांना दिली गेली आहेत. या सर्व सोडती प्रथम मानवी व नंतर संगणकीय पद्धतीने काढल्या जात होत्या. यात आता आणखी सुधारणा केली जाणार असून म्हाडाप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने घरांचे आरक्षण केले जाणार आहे. त्यामुळे घर आरक्षणाचा प्रत्येक अर्ज हा ऑनलाइन स्वीकारला जाणार असून त्याची छाननी, जाहीरपत्र हेही ऑनलाइन असेल. त्यासाठी पणन विभागाने चाचपणी सुरू केली असून येत्या काळात सिडको तळोजा, घणसोली, वाशी, द्रोणागिरी, उलवा, पाचनंद या भागात पन्नास हजार घरे बांधणार आहे. सिडकोने व्हिडीओकॉनला दिलेली ३०० एकर जमीन रद्द करण्यात आल्याने ही जमीन नवीन घरनिर्मितीसाठी उपलब्ध झाली आहे. यानंतर बांधण्यात येणाऱ्या घरांसाठी ही पद्धत वापरली जाणार असून म्हाडासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविणाऱ्या संस्थेबरोबर चर्चा केली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी खारघर, पनवेल, द्रोणागिरी व पुष्पकनगर या भागांत दोन प्रकारे राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आराखडा सादर केला जाणार असून स्मार्ट सिटी अंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांचा शुभारंभ होणार आहे. या वेळी या पन्नास हजार घरांची उभारणी आणि त्या अनुषंगाने तयार होणाऱ्या स्मार्ट सुविधांची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया उपस्थितांसमोर मांडणार आहेत. अत्यल्प व अल्प गटासाठी होणारी ही घरनिर्मिती वेगाने व्हावी यासाठी भाटिया प्रयत्नशील असून तशा प्रकारे त्याची मांडणी केली जाणार आहे. खारघर भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावून सिडकोने स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. नव्याने तयार होणाऱ्या वसाहती या स्मार्ट सिटीला अनुकूल राहणार असल्याने सिडको केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक मदतीशिवाय स्मार्ट सिटी उभारणीला लागली असल्याचे चित्र उभे राहत आहे.