२००७ पासून दरमहा ७ हजार ५०० रुपयांचे भाडे लागू

वाशी येथील श्रदधा अपार्टमेंटमधील हलवण्यात आलेल्या रहिवाशांना सिडकोने चांगलाच झटका दिला आहे. २००७ पासून दरमहा ७ हजार ५०० रुपयांचे भाडे लागू केले आहे. ही रक्कम एका रहिवाशासाठी चार लाखांपर्यंत जात आहे. त्यामुळे सिडकोच्या निकृष्ट बांधकामाचा येथील रहिवाशांना दुहेरी फटका बसला आहे. नवी मुंबई पालिकेने संक्रमण शिबिरात राहणाऱ्या रहिवाशांना त्यांच्या जुन्या घराजवळच तात्पुरते बांधकाम करून राहण्याची मुभा दिली आहे.

सिडकोने वाशी येथे ८० च्या दशकात विकलेल्या काही घरांच्या निकृष्ट बांधकामामुळे अल्पावधीतच या इमारतींचे बांधकाम कमकुवत झाले आहे. त्यामुळे या इमारतींच्या पुनर्बाधणीचा प्रश्न ऐरणीवर आला होती. येथील रहिवाशांनी सिडकोच्या या अन्यायाविरोधात चळवळी उभारल्या. त्याला काही राजकीय पक्षांचा पांठिबा मिळाला. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी या इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी अडीच एफएसआय सरकारने मंजूर केला आहे. याचा फायदा वाशी येथील काही रहिवाशांनी उचलताना पुनर्बाधणीचे प्रस्ताव सादर केले आहेत. सिडकोने धोकादायक व अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांचे जुईनगर येथील सिडकोच्या विक्रीविना पडून असलेल्या घरात स्थलांतर केले होते. वाशीतील सिडकोच्या बहुंताशी इमारती या धोकादायकमध्ये मोडणाऱ्या आहेत. त्यामुळे श्रद्धा अपार्टमेंटमधील १२२ कुटुंबांना जुईनगर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. सिडकोच्या धोकादायक इमारतीच्या बदल्यात ही घरे दिली गेली होती. वीस वर्षे हे रहिवासी या ठिकाणी तडजोड करून राहत आहेत. त्यांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. वाशीसारखे मध्यवर्ती ठिकाण सोडून त्यांना एका बाजूच्या जुईनगरमध्ये वीस वर्षे काढावी लागली आहेत. इतके वर्षे भाडेपट्टा न देता राहणाऱ्या या रहिवाशांना सिडकोने अलीकडे प्रति महिना सात हजार ५०० रुपये दराने भाडेपट्टा आकारला असून त्याची मागील दहा-बारा वर्षांतील थकबाकी चार लाखांपर्यंत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे रहिवासी आश्चर्यचकित आहेत.

सिडकोच्या चुकीमुळे श्रद्धामधील रहिवाशांना वीस वर्षे जुईनगरमध्ये त्रास सहन करावा लागला. या त्रासाबदल्यात सिडकोने या रहिवाशांना नुकसानभरपाई देण्याऐवजी त्यांना भाडे थकबाकीच्या नोटिसा बजावल्या आहेत. रहिवासी सिडकोला एक पैसादेखील देणार नाही. सिडकोने यात जबरदस्ती केली तर आंदोलन हाती घेतले जाईल

– किशोर पाटकर, स्थानिक नगरसेवक, वाशी