|| विकास महाडिक

३५ टक्के घरे ‘आवास’ योजनेसाठी; पुढील महिन्यात पहिल्या टप्प्यासाठी कंत्राटदारांचा देकार

Thane Housing Court
ठाणे हाऊसिंग अदालतीत तक्रारदारांना दिलासा, प्रलंबित १२० पैकी ११० तक्रारींवर निर्णय
Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Nashik Citylink bus
परीक्षा काळातच नाशिकची सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

लोकसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेली सिडकोच्या ९० हजार घरांच्या महागृहनिर्मितीच्या सोडतीला आता ऑगस्ट महिन्याचा मुहूर्त काढला आहे. पाच जुलै रोजी या घरांच्या उभारणीतील पहिल्या टप्प्यासाठी कंत्राटदारांचा देकार येणार आहे. गेल्या वर्षी सिडकोने १४ हजार ७३८ घरांची सोडत १५ ऑगस्ट रोजी काढली होती. या घरांची विक्रीही त्याच दिवशी सुरू होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानके व ट्रक टर्मिनल्स यांच्यासाठी राखीव असलेल्या जागांवर यातील काही घरे बांधली जाणार आहेत. या योजनेतील ३५ टक्के घरे ही पंतप्रधान आवास योजनेसाठी राखीव ठेवली जाणार आहेत.

गेल्या पन्नास वर्षांत केवळ एक लाख ३० हजार घरे बांधणाऱ्या सिडकोने मागील दोन वर्षांतच लाखभर घरांची घोषणा केली आहे. त्यातील १४ हजार घरे मागील वर्षी सोडत काढून ग्राहकांना जाहीर करण्यात आली आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घरांच्या बांधकामाला सुरुवात करतानाच सोडत काढण्याची पद्धत अवलंबली आहे. या ९० हजार घरांपैकी ५३ हजार घरे ही आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ घटकांसाठी असून शिल्लक ३८ हजार घरे ही अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी आहेत. पंतप्रधान आवास योजनेतील ३५ टक्के घरांमुळे या योजनेला केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागली असून राज्य सरकारचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने याला दोन महिन्यांपूर्वीच हिरवा कंदील दाखविला आहे. केंद्र सरकारच्या सर्वासाठी घर या योजनेअंतर्गत सिडको व म्हाडावर मोठय़ा प्रमाणात घरे बांधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सिडकोकडे आता जमिनीचा तुटवडा आहे. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर होणाऱ्या रेल्वे स्थानके व ट्रक टर्मिनल्सच्या जागांवर ही महागृहनिर्मिती केली जाणार आहे. यातील २५ हजार घरे ही तळोजा परिसरात असून १५ हजार घरे ही कळंबोली, वाशी, आणि खारघर येथील ट्रक टर्मिनल्सच्या जागेवर होणार आहेत. सिडकोने महामुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांबाहेर वाहनतळांसाठी विस्तीर्ण अशी मोकळी जागा ठेवली आहे. त्याच जागेचा उपयोग करुन वर गृहसंकुल व खाली वाहनतळ अशी ही योजना आहे.

सिडकोच्या नियोजन विभागाने या घरांचा आराखडा तयार केला असून यातील पहिल्या टप्प्यातील घरांच्या बांधणीची निविदा प्रक्रियेतील देकार येत्या पाच जुलै रोजी येणार आहे. ही निविदा प्रक्रिया संपुष्टात आल्याने लगेच या टप्प्यातील घरांची सोडत काढली जाणार असून ती ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडय़ात जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सिडकोने १५ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित घरांचे अर्ज विक्री सुरू केली होती आणि २ ऑक्टोबर रोजी त्याची सोडत काढण्यात आली होती.

‘सर्वसामान्यांनी घर घेण्याची घाई करू नये’

सिडकोच्या या महागृहनिर्मितीचा सर्वाधिक फटका हा खासगी विकासकांना होणार आहे. सिडकोची ही गृहनिर्मिती गेल्या वर्षी जाहीर केल्यापासून विकासक अनेक सवलती देऊन ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. त्यात काही ग्राहक अडकले जात असून सिडकोच्या या महागृहनिर्मितीच्या सोडतीनंतर महामुंबई क्षेत्रातील बांधकाम क्षेत्रातील बाजारभाव कोसळण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्षे खासगी विकासक धार्जिणे धोरण अंवलबणाऱ्या सिडकोला केंद्र व राज्य सरकारच्या रेटय़ामुळे मोठय़ा प्रमाणात घरे बांधावी लागत आहे. त्याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होणार असून ग्राहकांनी घरे घेण्याची घाई करु नये असे सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.

१६ ते ३० लाख रुपये किंमत

सिडकोच्या गेल्या वर्षीच्या मध्यमगृहनिर्मिती योजनेतील घरे ही कमीत कमी १६ लाख तर जास्तीत जास्त तीस लाखांपर्यंत किमतीची होती. सिडकोच्या घरांची किंमत ही तत्कालीन बाजार भावाप्रमाणे त्यांचा अर्थविभाग निश्चित करीत असल्याने अल्प व दुर्बल घटकासाठी असलेल्या घरांची किंमतही जवळपास गेल्या वर्षी इतकीच राहण्याची शक्यता आहे. यात पंतप्रधान आवास योजनेसाठी ग्राहकांना अडीच लाखांपर्यंत अनुदान मिळत आहे.

मुंबई वाढीला आता मर्यादा आल्या असल्याने महामुंबईला एक अन्यन्यसाधारण महत्त्व येणार आहे. हे लक्षात घेऊन सिडकोने गृहनिर्मितीला चालना दिली असून ९० हजार घरांच्या बांधकामासाठी पाच जुलै रोजी देकार येणार असून ऑगस्टमध्ये या घरांची सोडत काढली जाणार आहे.    – लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

  • ९०,००० – घरांची निर्मिती
  • ५३, ०००- घरे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी
  • ३८,००० – घरे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी