सिडकोच्या घरांच्या सोडतीतील विजेत्यांच्या आनंदाला उधाण

नवी मुंबई नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहरात हक्काचं घर मिळण्याची काहींची इच्छा मंगळवारी पूर्ण झाली. सिडकोने जाहीर केलेल्या महागृहनिर्मितीतील ९ हजार २४९ आणि स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील शिल्लक ८१० घरांची मंगळवारी नेरुळ येथील आगरी-कोळी भवनात सोडत काढण्यात आली. भाग्यवान १० हजार विजेते हे अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील आहेत.

अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी असलेल्या या घरांसाठी अर्ज केलेल्यांमध्ये भाग्यवानांची यादी ‘डिजिटल स्क्रीन’वर झळकल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर हसू खुलले.

आगरी-कोळी भवनात आयोजित करण्यात आलेल्या या सोडतीसाठी निमंत्रित करण्यात आलेल्या अर्जदारांमध्ये ज्यांना घर मिळाले त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. ज्या ग्राहकांना घर जाहीर झाले आहे, त्यांना त्याची माहिती मोबाइल संदेशांद्वारे कळविण्यात आली.

काही घरे शिल्लक राहण्याची शक्यता

महागृहनिर्मितीतील ७९०५ घरांतील सिडको कर्मचारी, प्रकल्पग्रस्त, पत्रकारांसाठी असलेली काही घरे शिल्लक राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शिल्लक घरांचा तपशील रात्री उशिरापर्यंत निश्चित होऊ शकलेला नाही. सिडकोच्या महागृहनिर्मितीतील काही आरक्षित घरे शिल्लक राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी काढण्यात आलेल्या १४ हजार ७८७ घरांमध्ये आरक्षित ग्राहकांनी मागणी न केल्याने ११०० घरे शिल्लक राहिली होती. ती सिडकोने नंतर वेगळी सोडत काढून विकली. हे करताना आरक्षणाची अट शिथिल करण्यात आली होती.

दोघा भावांना पहिल्याच प्रयत्नात घर

कोपरखैरणेतील माथाडी वसाहतीतील ज्ञानेश्वर पांडुरंग बैलकर आणि सोपान पांडुरंग बैलकर या दोघा भावांना पहिल्याच प्रयत्नात तळोजा येथील गृहप्रकल्पातील घरांचा लाभ झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात मंगळवारी आनंदाला उधाण आले होते.

आनंद द्विगुणित

सध्या नेरुळ येथे राहणारे निवृत्त जवान अरुण खामकर यांना तिसऱ्या प्रयत्नात घणसोली येथील गृहप्रकल्पातील घराचा लाभ झाला. खामकर हे कुटुंबासमवेतच आगरी-कोळी भवनात आले होते. त्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे ते म्हणाले.

या वेळी एकटाच आलो होतो..

रबाळे औद्योगिक वसाहतीत चहाची टपरी चालविणारे कृष्णराम देवासी हे विजेते ठरले. घर मिळाल्याचे कळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. गेल्या वेळी घर लागेल, या आशेने कुटुंबासहित आलो होतो, परंतु निराशा झाली होती. या वेळी एकटाच आलो आणि आनंदवार्ता मिळाली, असे देवासी म्हणाले.

पहिल्याच प्रयत्नात यश

सिडकोच्या घरासाठी डोंबिवलीतील सदानंद खुटवड यांनी आजवर सात वेळा अर्ज भरले, परंतु त्यांना घर लागले नाही. तर डिंपल वर्मा यांना पहिल्याच प्रयत्नात घर लागल्याने त्यांना आनंदाचा धक्का बसल्याचे मत व्यक्त केले.

२६ वर्षांनंतरचे स्वप्न पूर्ण

सिडकोच्या गृह प्रकल्पात घर मिळावे यासाठी आम्ही गेली दोन वर्षे अर्ज करीत होतो. अखेर आज संविधानदिनी आमच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. उलव्यासारख्या विकसित उपनगरात हे घर मिळाल्याने आम्हाला आनंद झाला आहे. २६ वर्षांनंतर घराचे स्वप्न पूर्ण झाल्याचे विजेत्या संजीवनी गाडगे यांनी सांगितले.

घरबसल्या आनंदाची बातमी

आगरी-कोळी भवनात मोजक्या नागरिकांना ऑनलाइन सोडतीसाठी निमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे सोडतीच्या ठिकाणी फार मोठी गर्दी झालेली नव्हती. घरांच्या सोडतीची प्रक्रिया ‘फेसबुक लाइव्ह’ असल्याने विजेत्यांची माहिती अर्जदारांना वेळोवेळी मिळत होती. सिडकोच्या संकेस्थळावरही लगोलग माहिती देण्यात येत होती. ती ‘अपडेट’ही केली जात होती. त्यामुळे अनेकांना घर लागले की नाही, याची माहिती मिळत होती. सकाळी नऊ  वाजल्यापासून काही जण कुटुंबासमवेत आले होते. प्रत्यक्ष प्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरू झाली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ती पार पडली. या वेळी संगणकीय पर्यवेक्षक सुरेश कुमार आणि राष्ट्रीय विज्ञान संस्थेचे उपसंचालक मोईझ अली व अधिकारी उपस्थित होते.