निविदा प्रक्रियेतील अडथळे दूर झाल्यानंतर जाहिरात

महामुंबई क्षेत्रातील गृह निर्मितीला कलाटणी देणारा सिडकोचा ९० हजार गृह निर्मितीच्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कंत्राटदाराबरोबर चर्चा झाल्यानंतर ही निविदा जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीअगोदर या ९० हजार घरांच्या सोडतीचा बार उडवून दिला जाणार आहे.

गेल्या वर्षी सिडकोने १४ हजार ७३८ घरांची सोडत स्वातंत्र्यदिनी काढली होती. ९० हजार घरांची सोडतही याच दिवशी काढली जाणार होती; पण प्रकल्पात आणखी ५०० घरांची संख्या वाढल्याने निविदा प्रक्रियेत भाग घेणाऱ्या बांधकाम कंपन्यांना मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आता निविदा जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्र सरकारच्या ‘सर्वासाठी घर’ या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने सिडकोला जादा घरे बांधण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार  सिडकोने त्यांच्या अखत्यारित असलेल्या रेल्वेस्टेशन बाहेरील वाहनतळ भूखंडाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोकडे सध्या जमीन कमी आहे. ताब्यात असलेली जमीन अद्याप प्रकल्पग्रस्तांना वाटप करणे बाकी आहे. त्यामुळे खारघर, खांदेश्वर, खारकोपर, उलवा या भागांत ही घरे बांधली जाणार आहेत. रेल्वे स्टेशन बरोबरच सिडकोने प्रत्येक मोठय़ा नोडमध्ये ट्रक टर्मिनससाठी राखून असलेल्या भूखंडाचा उपयोग केला जाणार आहे. अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ५३ हजार तर आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकासाठी ३८ हजार घरे बांधली जाणार आहेत.

सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी देश-विदेशातील अनेक बडय़ा बांधकाम व्यावसायिकांनी रस दाखविला असून पाच टप्प्यात होणाऱ्या या कामाची निवाडा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यांच्याकडून काही तडजोड करून देकार कमी करता येईल का? यासाठी सिडको प्रयत्न करीत आहे. त्यामुळे हा देकार जाहीर करण्यात आलेला नाही. निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्याने आता संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर या घरांची सोडत काढली जाणार आहे. ती पुढील महिन्यात निघण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही सोडत जाहीर होणार आहे.

गेली अनेक दिवस सुरू असलेली ९० हजार गृह निर्मितीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निविदाकारांबरोबर तडजोड चर्चा करून निविदा जाहीर केली जाणार आहे.     – संजय चौटालिया, मुख्य अभियंता, सिडको.