सात हजार घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना संधी; दिवसाला शंभर जणांना घराचा ताबा

नवी मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे सिडकोने एक जुलैपासून दोन वर्षांपूर्वी काढलेल्या सोडतीतील घरांचा ताबा देण्यास सुरुवात केली असून दिवसाला शंभर लाभार्थीना घरांची नोंदणी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. घरांच्या देखभाल खर्चासह सर्व रक्कम भरणाऱ्या लाभार्थीना ही घरे दिली जाणार असून अर्ज छाननीत बाद ठरलेल्या सात हजार घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना संधी दिली जाणार आहे. याशिवाय सिडको पुढील घरांचीदेखील लवकरच सोडत काढणार आहे. घरांचा ताबा आणि शिल्लक घरांच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत भर पडणार आहे.

सर्वासाठी घर या केंद्र सरकारच्या गृह योजनेची अंमलबजावणी करताना सिडकोने महागृहनिर्मितीला दोन वर्षांपासून सुरुवात केली आहे. यातील २५ हजार घरांचे प्रत्यक्षात काम सुरू असून परिवहन आधारित गृहसंकुलावर भर देण्यात आला आहे.

या घरांची दोन वर्षांपूर्वी सोडत काढण्यात आली होती. त्यातील घरांची सर्व रकमेसह देखभाल खर्च भरणाऱ्या ग्राहकांना सिडकोने घरांचा प्रत्यक्षात ताबा देण्यास गुरुवारपासून सुरुवात केली आहे.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लाभार्थीपैकी ११ जणांना घरांचे ताबापत्र दिले आहे. सिडको आता टप्प्याटप्प्याने या घरांचा ताबा देणार असून १४ हजार ८३८ घरांपैकी काही घरे ही अर्जदारांच्या छाननीमध्ये बाद झालेली आहेत. ही संख्या सात हजारांच्या घरात आहे. सिडको सोडत काढताना एक प्रतीक्षा यादी देखील तेवढय़ाच सोडतीची काढत असते. त्यामुळे अर्ज छाननीत बाद झालेल्या ग्राहकांच्या जागी प्रतीक्षा यादीतील ग्राहकांची वर्णी लागत आहे.

प्रतीक्षा यादीतील ग्राहकही करोनाकाळात झालेली वेतनकपात व बेरोजगारी यामुळे घर घेण्यास तयार नाहीत. मूळ अर्जदार व प्रतीक्षा यादीकडून नाकारण्यात आलेली घरे सिडको विशेष संर्वगातील नागरिकांना देत आहे. यात पोलिसांचा समावेश असून त्यांच्यासाठी चार हजार घरे राखीव ठेवण्यात आलेली आहेत. याशिवाय डॉक्टर, परिचारिका, साफसफाई कामगार, वॉर्ड बॉय या घटकांनादेखील सिडकोची घरे देण्याचा प्रस्ताव आहे.

या विशेष संर्वगांना सोडतीशिवाय घरे दिली जाणार आहेत. मात्र सिडकोने दोन लाख घरांचा आराखडा तयार केला होता पण सिडकोची आर्थिक स्थिती व जमिनीची उपलब्धता यामुळे ही संख्या ७५ टक्के आहे. त्यामुळे सिडको सध्या बांधकाम सुरू असलेल्या २५ हजार घरांसह ६५ हजार घरे बांधणार आहे. त्यांची सोडत येत्या काळात काढली जाणार असल्याचे गुरुवारी ताबा कार्यक्रमात सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.