आराखडा तयार; आठवडाभरात बांधकाम निविदा

विकास महाडिक, नवी मुंबई</strong>

सिडकोच्या गृहनिर्मितीला मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता राज्य शासनाच्या आदेशाने सिडकोने ८९ हजार ७७१ घरांचा आराखडा तयार केला असून पुढील आठवडय़ात त्याची बांधकाम निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. येत्या काळात ऑनलाइन विक्री सुरू करून महाराष्ट्रदिनी अर्थात १ मे रोजी या घरांची सोडत काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिडकोच्या इतिहासातील हा सर्वात मोठा गृहनिर्मिती प्रकल्प आहे.

एक वर्षांनंतर स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांत पर्दापण करणाऱ्या सिडकोने महागृहनिर्मितीचा धमाका सुरू केला आहे.

सिडकोच्या घरांना नवी मुंबईकर कितीही नावे ठेवत असले तरी विक्रीसाठी तयार करण्यात येणाऱ्या घरांना मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता सिडकोने ८९ हजार ७७१ घरांचा आराखडा तयार केला आहे. केंद्र सरकारच्या सर्वासाठी घरे या योजनेअंर्तगत राज्यात सिडको व म्हाडा सर्वाधिक घरे बांधणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामुंबई क्षेत्रात महागृहनिर्मिती करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. सिडकोचे नवीन व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनीही सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करणारी परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. बांधकाम सुरू असतानाच घरांची विक्री ही नवीन संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली आहे. सिडकोकडे मोठय़ा प्रमाणात निधी शिल्लक असल्याने सिडको यापूर्वी घरे बांधून तयार झाल्यानंतरच ग्राहकांना चढय़ा किमतीत विकून गडगंज पैशा जमविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. या अर्थशास्त्राला फाटा देऊन चंद्र यांनी बांधकामानुसार ग्राहकांकडून मासिक हप्ते आकारण्यास सुरुवात केल्याने ग्राहकांना बँक कर्जाचा पडणारा भुर्दंड वाचला आहे.

सुमारे १५ हजार आणि शिल्लक एक हजार १०० घरांना मिळणारा प्रतिसाद पाहता सिडकोने ८९ हजार ७७१ घरांचा आराखडा दक्षिण नवी मुंबई भागात तयार केला आहे. यातील ५३ हजार ४९३ घरे ही पंतप्रधान आवास योजने अंर्तगत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत, तर शिल्लक ३६ हजार २८८ घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. यासाठी केंद्र सरकारकडून अनुक्रमे अडीच व २ लाख ६७ हजार रुपये अनुदान देखील मिळणार आहे. येत्या पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने तयार होणाऱ्या या घरांची बांधकाम निविदा येत्या आठवडय़ात प्रसिद्ध केली जाणार असून या महागृहनिर्मितीला प्रत्यक्षात दोन ते तीन महिन्यात सुरुवात होणार आहे. त्यामुळे बांधकाम आणि विक्री एकाच वेळी करण्याच्या नवीन धोरणानुसार या घरांची ऑनलाइन विक्री सुरू करून महाराष्ट्रदिनी सोडत काढली जाणार आहे.

विशिष्ट दिनी मुहूर्ताचा पायंडा

सिडकोने काही विशिष्ट दिनी ऑनलाइन विक्री व सोडत काढण्याचा प्रयत्न केला आहे. १४ हजार ८३८ घरांची ऑनलाइन विक्री १५ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आली, तर २ ऑक्टोबर गांधी जयंतीदिनी सोडत प्रसिद्ध करण्यात आली. शिल्लक घरांची विक्री नवीन वर्षांच्या प्रारंभी तर सोडत प्रेमदिनी १४ फेब्रुवारी रोजी आहे. हाच प्रयत्न ९० हजार घरांसाठी असून सोडत १ मे महाराष्ट्रदिनी निश्चित करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या सर्वासाठी घर या संकल्पनेला समोर ठेवून राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार सिडकोने महामुंबई क्षेत्रात सुमारे ९० हजार घरांचा आराखडा तयार केलेला आहे. यातील जास्तीत जास्त घरे ही दक्षिण नवी मुंबईत राहणार आहेत. या महागृहनिर्मितीवर सिडकोने लक्ष केंद्रित केले असून येत्या आठवडय़ात पहिल्या टप्प्यातील या कामांच्या निविदा काढल्या जाणार आहेत. महाराष्ट्रदिनी या घरांची प्रत्यक्षात सोडत काढण्याचा सिडकोचा प्रयत्न राहणार आहे.

– लोकेश चंद्र,व्यवस्थापकीय संचालक, सिडको