सिडकोच्या नऊ हजार नवीन आणि जुन्या आठशे घरांच्या नोंदणीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून दसऱ्याच्या मुहूर्तावर ऑनलाइन नोंदणी व अनामत रक्कम भरणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले आहे. या प्रकल्पासाठी घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी सिडकोने सहज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हा अर्ज कसा भरायचा याची ध्वनिचित्रफितही तयार करण्यात आली आहे. तरीही काही संगणक केंद्र ग्राहकांकडून अर्ज भरून घेण्यासाठी  ३०० ते ५०० रुपये आकारत आहेत.

९ हजार २४९ घरांच्या सोबत खारघरमधील स्वप्नपूर्ती गृह संकुलातील ८१४ तयार घरांची देखील सोडत काढली जाणार आहे. ही घरे तयार असल्याने त्यांना जास्त मागणी आहे. केवळ ८१४ घरांसाठी आतापर्यंत तीस हजार अर्ज आले असून वीस हजारांनी अनामत रक्कमदेखील भरली आहे. तर नव्याने बांधण्यात येणाऱ्या ९ हजार २४९ घरांसाठी ५३ हजारांपेक्षा जास्त ग्राहकांनी रस दाखविला आहे. यातील ३२ हजारांनी आरक्षण रक्कम भरलेली आहे. बाजारात आर्थिक मंदी असताना सिडकोच्या घरांना चांगली मागणी आहे. ही सर्व घरे अल्प व आर्थिक दृष्टय़ा दुर्बल  घटकातील ग्राहकांसाठी राखीव आहेत. यात मध्यम व उच्च उत्पन्न गट नाही. त्यामुळे पहिल्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या नागरिकांची या घरांना पसंती आहे. त्यात पंतप्रधान आवास योजनेअंर्तगत घराला दोन लाख ६७ हजार अनुदान मिळत असल्याने ग्राहकांच्या उडय़ा पडलेल्या आहेत.

सिडको या सर्व घरांचा ताबा येत्या तीन वर्षांत देणार आहे. या घरांचे अर्ज भरण्यासाठी सिडकोने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरीही अनेक ग्राहकांना हे अर्ज भरण्यात अडचण येत आहे.  खासगी संगणक केंद्र तसेच सायबर कॅफेचा आधार घेत असून दोन मिनिटांच्या या अर्ज नोंदणीला हे संगणक साक्षर केंद्र तीनशे ते पाचशे रुपये घेत असल्याचे दिसून आले.

याशिवाय टीजेएसबी बँकेच्या सर्व शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी या ठिकाणी किरकोळ शुल्क आकारले जात आहे. ग्राहक बँकेच्या माध्यमातून अनामत रक्कम भरू शकणार आहेत.