पंधरा हजार घरांच्या इरादापत्रांचे वाटप

महामुंबई क्षेत्रात बांधण्यात येणाऱ्या ९४ हजार घरांपैकी सिडकोच्या नऊ  हजार घरांच्या अर्ज विक्रीचा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी यापूर्वीच्या पंधरा हजार घरांच्या इरादा लाभार्थ्यांना इरादापत्रेही देण्यात आली. या महागृहनिर्मितीसाठी पहिल्या टप्प्यात दोन लाख अर्ज येतील अशी अपेक्षा सिडकोच्या वतीने व्यक्त केली आहे.

सिडकोने खारघर, तळोजा, बामनडोंगरी या महामुंबई क्षेत्रात परिवहन आधारित गृहप्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील १५ हजार घरांची सोडत व बांधकाम सुरू झाले आहे. याशिवाय सिडकोने ९४ हजार घरांची घोषणा केली असून यातील ९२४६ घरांची अर्ज विक्री बुधवारपासून सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्ज विक्रीला ५ वाजता हिरवा कंदील दाखवला. तेव्हापासून या अर्जाची ऑनलाइन विक्री सुरू झाली आहे. या  ९२४६  हजार घरांसाठी दोन लाख अर्ज येण्याची शक्यता सिडकोच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

सिडकोने सुरू केलेल्या या अर्ज विक्रीला विधानसभा निवणुकीच्या आचारसंहितेची कोणतीही आडकाठी येणार नाही. दोन दिवसांपूर्वी होणारी ही अर्ज विक्री केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वेळेसाठी बुधवारी घेण्यात आली. फडणवीस यांच्या हस्ते सिडकोच्या इतर दोन प्रकल्पांचा शुभारंभ झाला. सिडकोने सुरू केलेल्या ९४ हजार घरांपैकी आता चार टप्प्यात बांधकाम आणि अर्जविक्री होणार आहे. त्यातील पहिला टप्पा बुधवारी सुरू करण्यात आला. त्यामुळे यानंतरच्या टप्प्यातील अर्ज विक्री सिडकोच्या वतीने थेट सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत नोंदणी करणारा अर्जदार हा इतर टप्प्यात होणाऱ्या अर्ज विक्रीत ग्राहय़ ठरणार आहे. सिडकोच्या या सर्व घरांसाठी दहा ते पंधरा ते सोळा लाख अर्ज येण्याची शक्यता असून पहिल्या टप्प्यातील नऊ हजार घरांसाठी दोन लाखांचा पल्ला गाठणार आहे.

महागृहनिर्मितीला किती प्रतिसाद?

सध्या बाजारात बांधकाम व्यवसायात मोठी आर्थिक मंदी आहे. अशा वेळी सिडकोने काढलेल्या या महागृहनिर्मितीला किती प्रतिसाद मिळतो याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. खासगी विकासकांचे या महागृहनिर्मितीने चांगलेच कंबरडे मोडणार आहे.