* नवीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांचा मानस
* सहव्यवस्थापकीय संचालक व्ही. राधा यांच्या बदलीचे वारे
माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी घालून दिलेल्या पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच सिडकोचे यापुढील कामकाज चालणार आहे. त्यात फार मोठे बदल केले जाणार नाहीत, असे सिडकोचे नवनिुयक्त व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी गुरुवारी घेतलेल्या विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केले.
राज्यातील एक श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोची मलिन झालेली प्रतिमा सुधरवण्याचे काम भाटिया यांनी गेल्या तीन वर्षांत केले आहे. यात त्यांना सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांचे मोठे सहकार्य मिळालेले आहे. सिडकोत आल्यानंतर सर्वप्रथम भाटिया यांनी पारदर्शक कारभाराचे सूत्र तयार केले होते. त्यात पारदर्शक आराखडा तयार करताना सर्व माहिती सिडकोच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली होती. विश्वासार्हता कराराची हमी देताना पाच कोटी रुपयेपेक्षा जास्त खर्चाच्या कामांना हा विश्वासार्हता करार बंधनकारक करण्यात आला आहे. पाच लाखांपेक्षा जास्त खर्चाच्या कामाचे तिऱ्हाईत संस्थेकडून पर्यवेक्षण करण्याची हमी देण्यात आली आहे.
नागरी सुविधा केंद्राद्वारे सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारी माहिती, दक्षता विभागातर्फे भ्रष्टाचारावर प्रहार करण्याचा निर्धार व्यक्त करून साडेबारा टक्के विभागातील खणून काढण्यात आलेले गैरप्रकार आणि तक्रार निवारण केंद्र यांसारख्या कायमस्वरूपी पद्धती भाटिया यांनी सिडकोत रुजवल्या आहेत. लोकाभिमुख प्रशासनासाठी आवश्यक असलेल्या या सर्व पद्धतीनुसारच यापुढीलदेखील कामकाज केले जाईल, अशी ग्वाही गगराणी यांनी दिली आहे. प्रशासकीय कामात थोडेफार बदल केल्यानंतर पूर्वीप्रमाणे जोमाने काम करण्याचा सल्ला त्यांनी सहकाऱ्यांना दिला आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, रेल्वे, नैना, स्मार्ट सिटी, जेएनपीटी विस्तार, बाळगंगा धरण या बडय़ा प्रकल्पाची यावेळी त्यांनी संबधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

आता व्ही. राधा यांची बदली?
भाटिया यांनी राज्य सरकारकडून विशेषत्वाने मागून घेतलेल्या त्यांच्या सहकारी सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांच्या सिडकोतील कारकीर्दीला देखील पुढील महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत असून त्यांनी यापूर्वीच केंद्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाटिया यांच्या नवनवीन संकल्पना अमलात आणण्यामागे सर्वाधिक योगदान हे राधा यांचे आहे. त्यामुळे राधा याच गेली तीन वर्षे सक्रीय व्यवस्थापकीय संचालक होत्या असे बोलले जाते. भाटिया यांनीही त्यांना काम करण्याची पूर्ण मोकळीक दिली होती. त्यामुळे भाटिया व राधा यांचा एक चांगला सुसंवाद तयार झाला होता. ती मोकळीक गगराणी यांच्या काळात मिळणे शक्य नसल्याने राधा यांनीही सिडकोतून पाय काढण्याचे ठरविले आहे. विमानतळासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागेपर्यंत राधा यांनी सिडकोच्या धावपट्टीवर टिकून राहावे असा एक मतप्रवाह आहे, पण केंद्रात योग्य संधी मिळाल्यास राधा लागलीच ‘टेक ऑफ’ घेणार आहेत. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली होणार असल्याचे संकेत आहेत. त्यांच्या जागी सिडकोत अतिरिक्त असलेले दोन सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण किंवा सुनील केंद्रीकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर कित्ता’
गेली तीन वर्षे सिडकोत भाटिया पॅटर्न राबविल्यानंतर आता गगराणी यांचा कोल्हापूर पॅटर्न राबविला जाणार आहे. कर्मधर्मसंयोगाने सिडकोत संध्या उच्चपदावर असलेले सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी विजय पाटील, अतिरिक्त भूमापन अधिकारी व सध्या विमानतळ जमीन संपादनाची जबाबदारी असलेली अनिल पाटील, सहव्यवस्थापकीय संचालिकांचे विशेष कार्यकारी अधिकारी विशाल ढगे हे सर्व जण कोल्हापूरवासी असून या सर्व अधिकाऱ्यांची कार्यक्षमता लोकाभिमुख आहे. त्यामुळे सिडकोत यानंतर कोल्हापूर पॅटर्न राबविला जाणार अशी चर्चा आहे.