‘महामेट्रो’कडून काम पूर्ण करण्याची हमी
नवी मुंबई : चार वेळा सुरू होण्याच्या तारखा जाहीर करूनही आतापर्यंत न धावणारी सिडकोची नवी मुंबई मेट्रो पुढील वर्षी धावणार आहे. सहा वर्षे रखडलेले या सेवेचे काम संथगतीने सुरू असल्याने सिडकोने सर्व कंत्राटदारांना हटवून त्या जागी महा मेट्रोला हे काम दिले असून काम पूर्ण करण्याची पुढील वर्षांची शाश्वती घेतली आहे.
प्रकल्प कार्यान्वित होण्यास विलंब झाल्याने प्रकल्प खर्च हा एक हजार कोटीने वाढला असून या प्रकल्पासाठी लागणारा खर्च उभारण्याची जबाबदारीही महामेट्रो पार पाडणार आहे.
सिडकोने दक्षिण नवी मुंबईत पाच मेट्रो मार्गाचे नियोजन केले आहे. बेलापूर ते पेंदार हा पहिल्या टप्प्यातील अकरा किलोमीटर मार्गाचे काम सध्या सुरू आहे. याशिवाय खांदेश्वर रेल्वे स्टेशन ते तळोजा एमआयडीसी, पेंदार ते तळोजा एमआयडीसी अंर्तगत मेट्रो मार्ग, दिघा ते बेलापूर असे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यातील बेलापूर ते पेंदार या अकरा किलोमीटर मार्गातील स्थापत्य कामे ही ९० टक्के पूर्ण झाली आहेत. मात्र विद्युत, माहिती तंत्रज्ञान आणि तांत्रिक कामे अद्याप शिल्लक आहेत. मेट्रो रेलमध्ये सर्वात महत्त्वाची डक्ट लाइन टाकण्याचे काम असून सिडकोने शीव पनवेल मार्गावरील उड्डाणपूल देखील या डक्टने जोडला आहे. त्यामुळे तांत्रिक आणि विद्युत कामांचे आव्हान आता शिल्लक आहे.
सिडकोने हे काम आता ‘महामेट्रो’ला देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘महामेट्रो’ने नागपूर व पुण्यातील मेट्रो मार्गाना चांगली गती दिली आहे. त्यामुळे ‘महामेट्रो’च्या वतीने दीड वर्षांत हे काम पूर्ण होईल अशी खात्री देण्यात आलेली आहे. सिडकोने आतापर्यंत तीन कंत्राटदार हलगर्जीपणामुळे बदललेले आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या रायगड जिल्हा प्रचारासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनीही सिडकोने दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबई मेट्रो २०२१ रोजी सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. फडणवीस यांनी तर सप्टेबर २०१९ मध्ये या मार्गाची चाचणीला हिरवा कंदील दिला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 2:10 am