नवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्मितीतील घरांच्या विक्री बरोबरच खासगी विकासकांनी तयार घरांची विक्री व्हावी यासाठी सिडकोने खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथे बारा मोठय़ा भूखंडांची विक्री करण्यासाठी देकार मागविला आहे. या भागात सिडकोच्या हजारो घरांचे बांधकाम सुरू आहे पण याच वेळी मोकळ्या असलेल्या भूखंडांची विक्री करुन सिडको बांधकाम व्यवसायिकांनी संधी देत तिजोरीत भर टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. यात कमीत कमी दोन हजार ते जास्तीत जास्त आठ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंडांचा समावेश आहे.

सिडकोने मागील महिन्यात लघु तसेच मध्यम आकाराच्या भूखंडांची विक्री केली असून त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. मोकळ्या जमिनींवर अतिक्रमण होऊ नये यासाठी या भूखंडांची विक्री सुरू केली आहे. आता खारघर, कळंबोली, आणि नवीन पनवेल येथे वाणिज्यिक व निवासी भूखंड विक्रीसाठी काढले आहेत. यामुळे खासगी विकासकांना चालना मिळेल असा सिडकोचा विश्वास आहे. सिडकोच्या संकेतस्थळांवरनिविदा पुस्तिका मिळणार असून १५ जून ते ६ जुलै पर्यंत देकार स्विकारले जाणार आहेत. आठ जुलै रोजी ह्य़ा निविदा उघडण्यात येणार आहेत.

सिडकोने बांधकाम व्यवसायाला या करोना काळात चालना देण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. छोटय़ा भूखंडांच्या विक्री नंतर आता मोठय़ा भूखंडांवर उभे राहणारी गृह तसेच वाणिज्यिक संकुले हे शहराच्या विकासात भर घालणारी आहेत.

-डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको