सहकारी महिलेचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या हिमांशू शेखर या सिडकोतील संगणक प्रणाली विश्लेषक अधिकाऱ्याला सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी निलंबित केले आहे. या अधिकाऱ्याने २५ वर्षीय महिलेचा छळ केल्याची तक्रार सीबीडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तो फरार होता. शुक्रवारी त्याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवल्याने त्याची अटक टळली आहे.सिडकोच्या संगणक प्रणाली (डेटा ऑपरेशन) केंद्रात काम करणाऱ्या एका कंत्राटी महिलेचा या आरोपीने विनयभंग केल्याची तक्रार सर्वप्रथम दक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी त्या महिलेची तक्रार ऐकून घेतल्यानंतर सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्या महिलेने सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर शेखर यांना अटक करण्यासाठी पोलीस गेले, मात्र ते सापडले नाहीत. कार्यालयीन महिलांचा विनयभंग होऊ नये, यासाठी कठोर कायदा करण्यात आल्याने हिमांशू यांना पुढील चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. एखाद्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे निलंबित करण्याची नवी मुंबईतील ही पहिलीच घटना आहे.