06 March 2021

News Flash

इमारत उंची मर्यादा वाढवल्याने ‘खारघर हिल प्ल्यॅटय़ू’ला संजीवनी

सिडकोचा बेलापूर व खारघरमधील ‘थीम सिटी’चा प्रस्ताव मार्गी लागणार

सिडकोचा बेलापूर व खारघरमधील ‘थीम सिटी’चा प्रस्ताव मार्गी लागणार; नवी मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा प्रकल्प

विकास महाडिक, लोकसत्ता

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या प्रभावित क्षेत्रात विमान प्राधिकरणाने इमारत उंची मर्यादा निश्चित केल्याने बारा वर्षांपूर्वी सिडकोने गुंडाळलेला एक हजार ५०० कोटी रुपये उत्पन्न देणारा खारघर हिल प्लॅटय़ू प्रकल्पाला संजीवनी  मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विमान प्राधिकरणाने या खारघर टेकडीवर काही प्रमाणात उंच इमारती बांधण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईतील फिल्म सिटीप्रमाणे बेलापूर व खारघर मधील एका १०२ हेक्टर (२५५ एकर) जमिनीवर ‘थीम सिटी’ बनवण्याचा प्रस्ताव मार्गी लागणार आहे. या प्रकल्पामुळे सिडकोचे आर्थिक सुबत्तेचे जुने दिवस पुन्हा येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरांचे शिल्पकार म्हणवणाऱ्या सिडकोने विमानतळ, मेट्रो, रेल्वे, गोल्फ, सेट्रल पार्क, प्र्दशन केंद्र यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवून बिरुद सार्थ करण्याचा प्रयत्न केला आहे. या साखळीत बेलापूर येथील पारसिक डोंगराच्या कुशीत असलेल्या सिडको मालकीच्या १८९ हेक्टर जामिनीचा विकास करण्याचा प्रस्ताव बारा वर्षांपूर्वी प्रशासनाने तयार केला होता. त्यासाठी या जमिनीचे सर्वेक्षण करून हॉलीवूड किंवा बॉलीवूडप्रमाणे या ठिकाणी ‘मायानगरी’ निर्माण करण्याचे आमंत्रण बडय़ा गुंतवणूकदारांना देण्यात आले होते. त्यानुसार २०१० मध्ये फ्युचर सिटी, इंडिया बुल्स आणि अलीकडेच आर्थिक अडचणीमुळे विमानतळाच्या कामावर पाणी सोडावे लागलेल्या जीव्हीके या तीन उद्योगसमूहांनी या १८९ हेक्टरपैकी १०२ हेक्टर जागेवर ‘थीम सिटी’ बनवण्याचा प्रस्ताव सिडकोला सादर केला होता. त्यासाठी फ्युचर सिटीने एक हजार ५०० कोटी ३० लाख रुपयांचा देकार या जमिनीसाठी दिला होता. त्यानुसार या ठिकाणी हॉलीवूडप्रमाणे एक माया नगरी निर्माण होणार होती. या ठिकाणी काही निवासी बंगलो बांधण्यास देखील परवानगी होती. त्यामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला जाणार होता. मात्र याच वेळी डिसेंबर २०१२ मध्ये नवी मुंबई विमानतळाला केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली. त्यात ३२ प्रकारच्या वेगवेगळ्या अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत. नवी मुंबई विमातनळाच्या सुमारे २४ किलोमीटर परिघातात इमारतीच्या उंचींना मर्यादा विमान प्राधिकरणाने घातल्या आहेत. नवी मुंबई विमानतळ हाकेच्या अंतरावर असलेल्या या खारघर हिल

प्लॅटय़ू प्रकल्पाला या इमारत उंची मर्यादा पडली आणि आणि हा प्रकल्प सिडकोला रद्द करावा लागला होता.

सिडकोने ही उंची मर्यादा सरसकट न लागू करता उड्डाण आणि उतार या परिघात लावण्यात यावी यासाठी सिडकोने सातत्याने प्रयत्न केले. त्याला यश येऊन विमान प्राधिकरणाने ही इमारत उंची मर्यादा शिथिल केली आहे. त्यामुळे १०२ हेक्टर पैकी ५७ हेक्टरला ४१ मीटर, ११ हेक्टरला १९ मीटर, २० हेक्टरला १० मीटर, आणि १४ हेक्टरला २४ मीटर अशी वेगवेगळी उंची मर्यादा निश्चित केला आहे. यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी आलेला दीड हजार कोटी रुपयांचा देकार इमारत उंची मर्यादेमुळे कमी झाला असला तरी बंगले आणि मायानगरी निर्माण करण्यास अडचण येणार नाही असे स्पष्ट दिसून येत आहे.

खारघर हिल फ्लॅटय़ू हा एक सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याला चालना मिळावी यासाठी सिडको सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याचा विकास येत्या काळात सल्लागार नियुक्तीने केला जाणार आहे. नवी मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अनेक प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प असून यामुळे नवी मुबंईचे जगात नाव होणार असल्याचा विश्वास आहे.

-डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 12:22 am

Web Title: cidco proposal for theme city between belapur and kharghar zws 70
Next Stories
1 रुग्णदुपटीचा कालावधी घटला
2 टाळेबंदीनंतर झुंजारे कुटुंबीयांचा प्रवास अखेरचा ठरला
3 मतदारांची आदलाबदल?
Just Now!
X