X
X

समुद्राच्या पाण्यावर पनवेलकरांची तहान भागविणार?

दोन दिवसांआड पाणी मागील अनेक महिन्यांपासून पनवेल शहरातील नागरिकांना मिळत आहे.

सिडको मंडळासमोर प्रस्ताव; ५२ दशलक्ष लिटर पाणी सात महिन्यांत उपलब्ध करण्याचा कंपनीचा दावा

पनवेल : पनवेलकर पाण्यासाठी व्याकूळ असताना, खारघर येथील सेंट्रल पार्क उद्यानाचे कंत्राटदार कंपनीने सिडको मंडळाला सुमारे ५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी समुद्रातून घेऊन ते शुद्ध करून उपलब्ध करण्याचा प्रस्ताव सिडको मंडळाच्या अध्यक्षांसमोर मांडला आहे. हा प्रस्ताव व्यवहार्य असल्यास आणि त्यास सिडको मंडळाने मान्यता दिल्यास खारघरजवळच्या खाडीपात्रातून सुमारे ५२ एमएलडी पाणी उपलब्ध करून घेतले जाईल. या प्रकल्पाला प्रत्यक्षात उभारणीसाठी सात महिने आणि सुमारे ४९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

संबंधित खर्च प्रस्ताव देणारी कंपनी उभारणार असून त्यामुळे प्रति हजार लिटर पाण्यासाठी २२ रुपये ७७ पैसे या दराने सिडको मंडळाने हे पाणी खरेदी करण्याचेही प्रस्तावामध्ये संबंधित कंपनीने म्हटले आहे. हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास चार लाख लोकसंख्येचा पाणी प्रश्न मिटण्याचा दावा संबंधित कंपनीने केला आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित कंपनीने लेखी पत्रव्यवहाराद्वारे सिडको मंडळाचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्यासमोर पनवेलच्या पाणी प्रश्नावर तोडगा म्हणून या प्रकल्पाचे स्मरण करून दिले आहे.

पाण्याच्या भीषण टंचाईला पनवेल शहरातील नागरिक तोंड देत आहेत. दोन दिवसांआड पाणी मागील अनेक महिन्यांपासून पनवेल शहरातील नागरिकांना मिळत आहे. पनवेल शहर महापालिकेने अमृत योजनेतून नवीन जलवाहिनी टाकण्याचा प्रस्तावाला कागदोपत्री गती दिली असली तरी हे सर्व उपाययोजना प्रत्यक्षात येऊन त्यातून पाणीपुरवठा होण्यासाठी सुमारे अडीच वर्षांहून अधिक काळाची गरज आहे. नवीन धरणनिर्मितीसाठी जागेची कमतरता, प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन यामुळे धरण बांधणार कधी व त्यातून पाणी मिळणार कधी हा प्रश्न आहे. या सर्व पाणीटंचाईच्या काळामध्ये समुद्रातील पाणी शुद्ध करून तो सामान्यांसाठी वापरण्यासाठी, पिण्यासाठी उपलब्ध करण्याचा प्रस्ताव हा आशेचा किरण ठरणार असल्याचे बोलले जात आहे. खारघर येथील यश क्रिएशन अ‍ॅण्ड व्हॅन्च्युअर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हा प्रस्ताव सुचविला आहे. खारघर येथील सेंट्रल पार्क या भव्य उद्याणाच्या देखरेख व दुरुस्तीचे काम या कंपनीने पाहिले आहे. खारघर येथील सेक्टर २३ व २४ मधील जमिनीवरील सेंट्रल पार्कचा विस्तार करून तेथे ६० हेक्टर जागेवरलंडन देशाच्या धरतीवर भव्य उद्यान व अम्युझमेंट पार्क उभारण्याचा प्रस्ताव याच कंपनीने सिडको मंडळासमोर मांडला होता. या कंपनीला सिडको मंडळाने घातलेल्या अटीमध्ये उद्यानाच्या विस्तारासाठी लागणारे पाणी उपलब्ध करण्याची जबाबदारी विकासक कंपनीने घ्यावी अशी शर्त होती. त्यामुळे इस्राइल देशातील जलशुद्धीकरणाच्या विभागातील तांत्रिक अग्रेसर कंपनीसोबत यश कंपनीने करार केला होता. या करारामुळे सेंट्रल पार्क येथील विस्तारित अम्युझमेंट पार्क प्रकल्पाला सुमारे ३ एमएलडी पाणी मिळणार होते. याच प्रस्तावाला चालना देत यश क्रीएशन कंपनीने सुमारे ५० एमएलडी पाण्याची उपलब्धता करून देऊ शकतो असा नवीन प्रस्ताव सिडको महामंडळाच्या अध्यक्ष ठाकूर यांच्यासमोर मांडला आहे. सेंट्रल पार्क या भव्य उद्यानाच्या प्रस्तावित अम्युझमेंट पार्कचा प्रकल्प संचालक मंडळाच्या बैठकीत विचाराधीन आहे. त्यावर पुनर्निविदा काढण्याचा सिडको मंडळाचा मानस आहे. परंतु यश क्रीएशनने सूचविलेल्या प्रस्तावामुळे सिडको वसाहतींमधील पाणी टंचाईला तुर्तसा विराम मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे.

प्रति एक हजार लिटर पाण्यासाठी सध्याचा दर २२ रुपये ७७ पैसे येण्याची शक्यता आहे. देशात अद्याप कोठेही समुद्राचे पाणी शुद्धीकरण करून वापरात येण्याचे उदाहरण नाही. काही वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेकडे समुद्रातील पाणी जलशुद्धीकरण सामान्यांना पिण्यासाठी पाणी देण्याचा प्रस्ताव याअगोदर आला होता, मात्र हा प्रस्ताव व्यवहार्य नसल्याने पालिकेने तो स्वीकारला नाही.

प्रकल्पाचे आयुष्य २५ वर्षांचे

खारघर सेक्टर २५ येथील १५ एकर किनारा नियमन अधिसूचना (सीआरझेड) जमिनीवर हा प्रकल्प करण्याचे सुचविण्यात आले आहे. या क्षेत्रापासून धारणतलाव काही मीटर अंतरावर आहे. त्यामुळे खाडीपात्रातील पाणी सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत आत जाऊन हे पाणी प्रकल्पापर्यंत आणता येईल. हा प्रकल्प चालविण्यासाठी इंधन लागणार आहे.  ५० एमएलडी पाणी शुद्धीकरणासाठी तेवढेच किंवा ५२ एमएलडी पाणी लागू शकेल. या प्रकल्पाचे आयुष्य २५ वर्षांचे असणार आहे. समुद्रातील खाऱ्या पाण्यावर प्रक्रीया करून क्षारविरहित शुद्धपाणी मिळू शकेल असा दावा संबंधित कंपनीचे संचालक शेखर सावंत यांनी केला आहे.

४९० कोटी रुपयांचा खर्च

प्रक्रिया झाल्यानंतर पाण्यातील क्षार काढून त्यातून कंपनी आपला केंद्र उभारण्याचा निधी मिळवू शकणार आहे. त्यानंतरच टाकाऊ पाणी पुन्हा समुद्रात सोडले जाईल. सात महिन्यांच्या कालावधी हा प्रकल्प उभारणीसाठी लागू शकेल. सुमारे ४९० कोटी रुपयांचा खर्च यासाठी येणार असून संबंधित यश क्रीएशन कंपनी हा निधी उपलब्ध करणार आहे.

संबंधित प्रकल्पाची जलतज्ज्ञांकडून पडताळणी करून पाहिल्यानंतर हा प्रकल्प दीर्घकाळ चालण्यायोग्य असल्यास संबंधित प्रकल्पाची व्यवहार्य तपासून नंतरच त्याबद्दल बोलता येईल. पनवेलकरांच्या जलस्त्रोताबद्दल संबंधित कंपनीशी मी स्वता पुढाकाराने बोलेन.

– प्रशांत ठाकूर, अध्यक्ष, सिडको महामंडळ