विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या निमित्ताने का होईना सिडकोने प्रकल्पग्रस्तांसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. ‘सिडको तारा’योजने अंर्तगत प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांपैकी अभियांत्रिकी किंवा वैद्यकिय क्षेत्रात उत्तम करीअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटी ‘जेईई’आणि ‘एआयआयएमएस’ पात्रता परिक्षासंर्दभात मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे राज्य सेवा आयोग व बँक प्रोबेशनरी अधिकार पदासाठी परिक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सराव परिक्षा घेतली जाणार असून २४ एप्रिल पर्यंत त्याची नाव नोंदणी आवश्यक आहे. प्रकल्पग्रस्तांपैकी दोन तरुणी आज दिल्ली येथे सनदी अधिकार पदाचे प्रशिक्षण घेत असून सिडकोने त्यांचा खर्च उचलला आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात शेतकऱ्यांची ६७१ हेक्टर जमिन आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना साडेबावीस टक्के योजने अंर्तगत भूखंड व नुकसान भरपाई देण्यात आली आहे. दहा गावातील ग्रामस्थांना आता टप्याटप्याने स्थलांतरीत केले जाणार आहे. सिडकोने या प्रकल्पग्रस्तांसाठी सर्वोत्तम पॅकेज देताना २६ कलमी कार्यक्रम आखला आहे. त्यानुसार सिडको तारा योजनेअन्वेय प्रकल्पग्रस्तामधील निष्णांत हुशार विद्यार्थ्यांना ह्य़ा परिक्षा कशा द्याव्यात याचे मार्गदर्शन जाणकारांकडून बुधवारी देण्यात आले. यावेळी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. याचवेळी राज्य सेवा आयोगाच्या परिक्षासंर्दभात मार्गदर्शन करुन त्यांचा सराव करुन घेतला जाणार आहे. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही, राधा यांनी प्रकल्पग्रस्तांपैकी एखादा तरी विद्यार्थी सनदी अधिकारी किंवा आयआयटीएन्स, डॉक्टर व्हावा यासाठी चंग बांधला असून बेलापूर येथे खास कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे.