News Flash

सिडको वसाहतींना जानेवारीत करदेयके

पनवेल शहर महापालिकेने खासगी संस्थांकडून शहरातील एकूण मालमत्ताधारकांचे प्रत्यक्ष जागेचे सर्वेक्षण केले.

(संग्रहित छायाचित्र)

पनवेल महापालिका साडेतीन वर्षांचा मालमत्ता कर चार टप्प्यांत वसूल करणार

नव वर्षांच्या पहिल्याच महिन्यात पनवेल पालिका हद्दीतील सिडको वसाहतींतील रहिवाशांच्या हाती मालमत्ता कराची नोटीस पडणार आहे. त्यामुळे २०२० हे वर्ष करदात्याच्या खिशाला कात्री लावणारे ठरणार आहे.

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या आर्थिक वर्षांचे मूल्यांकन नोटीस पहिल्यांदा देण्यात येणार आहे. त्यानंतर हरकती घेण्याची संधी नागरिकांना दिली जाणार आहे.  हरकतींवर सुनावणीनंतर पालिका स्थापन झाल्यापासून मागील साडेतीन वर्षांची देयके जमा करण्याचे निर्देश मालमत्ताधारकाला दिले जातील. त्यासाठी वर्षभरात चार वेगवेगळ्या टप्प्यांत कर भरण्यासाठी सवलत मिळणार आहे.

कर गोळा करण्याची पालिकेची ही पहिलीच मोहीम असल्याने त्यावर कोणताही दंड आकारण्यात येणार नसल्याचे पालिकेच्या कर विभागाच्या वतीने स्पष्ट  करण्यात आले.

पनवेल शहर महापालिकेने खासगी संस्थांकडून शहरातील एकूण मालमत्ताधारकांचे प्रत्यक्ष जागेचे सर्वेक्षण केले. सध्या जुन्या नगरपरिषद क्षेत्र आणि ग्रामीण परिसरातील मालमत्ताधारकांना कर आकारणी सुरू आहे. पालिका स्थापन झाल्यानंतर साडेतीन वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे तब्बल अडीच लाख मालमत्ताधारकांकडून अद्याप मालमत्ता कर वसूल केला नसल्याने पालिकेचा आर्थिक चणचण भासत आहे.  स्थापनेपासून करवसुली केली जाणार असल्याने २०२० च्या प्रारंभात पहिल्यांदा सिडको क्षेत्रातील करदात्याला पहिल्यांदा २०२०-२०२१ या आर्थिक वर्षांच्या मूल्यांकनाच्या (असेसमेन्ट) नोटिसा बजावण्यात येतील. या नोटिशीत संबंधित मालमत्तेच्या किती परिसराला कर आकारला याची माहिती दिली जाईल.

संबंधित मालमत्तेला किती कर कोणत्या सरकारी मूल्य दर तक्त्यानुसार (रेडीरेकनर) किती दर लागू केला आहे, याची माहिती स्पष्ट करण्यात आलेली असेल. सिडको क्षेत्रातील सुमारे अडीच लाख मालमत्ताधारकांकडून सुमारे २०० कोटी रुपयांचा वार्षिक मालमत्ता कर जमा होणार असल्याचे संकेत पालिकेने दिले आहेत.

पालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीतून थकीत आणि सध्याचा असा ६०० कोटी रुपयांहून अधिक कर पालिकेच्या तिजोरीत जमा करण्याचे उद्दिष्ट पालिका प्रशासनाने ठेवले आहे. शहरी मालमत्ताधारकांप्रमाणे औद्योगिक वसाहतींतील उद्योगांचा मालमत्ता कर दीडपटीने वाढणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाकडून मिळत आहेत.

अर्थात कर संकलनामुळे नागरिकांनाही सुविधा मिळणार आहेत. मात्र या करसंकलनामुळे सामान्य पनवेलकरांचे बजेट कोलमडणार आहे. सध्या पनवेल जुन्या नगरपरिषद क्षेत्रातून १८ कोटी रुपये उत्पन्न मालमत्ता करातून आहे. स्थापत्य आभियांत्रिकी कंपनीकडून पनवेलकरांच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करून घेतले असून २९ गावांमधील मालमत्ताधारकांना कर भरण्यात शहराच्या तुलनेत सवलत अधिक असणार आहे.

तंतोतंत आणि पारदर्शक

  •  सिडको वसाहतींमध्ये खारघर, कळंबोली, तळोजा, नावडे, कामोठे, नवीन पनवेल, खान्देश्वर या वसाहतींतील मालमत्ताधारक सिडकोकडे सेवा शुल्क भरतात. त्यामुळे नव्या करसंकलनाच्या नोटिसा सिडको वसाहतींमधील नागरिकांच्या हाती वर्षांच्या शुभारंभी मिळाल्यानंतर या नोटिसांवर मोठय़ा प्रमाणात हरकती नोंदविण्यासाठी तक्रारदार पुढे येणार असल्याने पालिकेने वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहातील सभागृहात हरकतींवर सुनावणी ठेवण्याचे नियोजन केले आहे.
  •  पालिका मालमत्ताकरांच्या नोटीस दिल्यानंतर नागरिकांमध्ये जनजागृती करणे, कराचे नागरिकांना होणारे लाभ, मालमत्ता सर्वेक्षणात असणारी पारदर्शकता याबाबत जनजागृती करणार आहे.
  •  २०२० च्या एप्रिलपासून मालमत्ताधारकांनी कर भरताना पहिल्या १५ दिवसांत कर ऑनलाइन जमा करणाऱ्यांसाठी पालिकेने पाच टक्यांची सवलत ठेवली आहे. तसेच ५०० चौरस फुटांच्या सदनिकाधारकांना वर्षांला सुमारे १० हजार रुपयांच्या आत कर भरावे लागणार असल्याचा अंदाज पालिकेच्या कर संकलन विभागाने बांधला आहे. तसेच वाणिज्य आणि औद्योगिक वापरासाठी मालमत्ताधारकांसाठी वेगळा दर असणार आहे. स्थापत्य कंपनीने अत्याधुनिक ड्रोनच्या साह्य़ाने पनवेल पालिकेने मालमत्तांचे सर्वेक्षण केल्याने तंतोतत चौरस फुटाचे मापके घेऊनच मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

कर भरणाऱ्यांना सवलत

नोटिसा मिळाल्यानंतर ऑनलाइन कर, थकीत कर एकत्रित भरल्यास सवलत, शून्य सौर ऊर्जा, शून्य कचरा, पर्जन्यजल संधारण प्रकल्प राबविणाऱ्या गृहसंस्थांना सवलत मिळणार आहे. याशिवाय गृहसंस्थांमधील सार्वजनिक जागा, वाहनतळ या परिसराला एकत्रितपणे कर वेगळा भरावा लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 12:31 am

Web Title: cidco quartz property tax akp 94
Next Stories
1 पावसामुळे कांदा दरात पुन्हा उसळी
2 ‘एनआरसी’ स्थानबद्धता छावणीसाठी जागेची पाहणी
3 वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलाचा मार्ग मोकळा
Just Now!
X