मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी सिडकोने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) २०० कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. ही रक्कम साडेसात टक्के व्याजाने दिली जाणार आहे.

‘एमएसआरडीसी’ने सिडकोकडे एक हजार कोटी रुपये मागितले होते. मात्र, विमानतळ, मेट्रो, कॉर्पोरेट पार्क, नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्प सुरू असल्याने जादा रक्कम देण्यास सिडकोने असमर्थता दर्शवली आहे. समृद्वीसाठी ‘एमएसआरडीसी’ने एमएमआरडीए, एमआयडीसी, एसआरए आणि म्हाडा या प्राधिकरणांकडेही निधी मागितला आहे. या प्रकल्पात संपादित करण्यात येणाऱ्या दहा हजार हेक्टर जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी ही रक्कम वापरली जाणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाप्रमाणे मुंबई-नागपूर या ७१० किलोमीटर महामार्गाचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत हा मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने महामंडळाने पावले उचलली असून, सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पात दहा जिल्ह्य़ांतील ३८१ गावांशेजारची दहा हजार हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यास अनेक ठिकाणी विरोध होत असला तरी शेतकऱ्यांना घसघशीत मोबदला देण्यासाठी एमएसआरडीसी निधी जमा करीत आहे.

तोटय़ात असलेल्या एमएसआरडीसीला दोनशे कोटी रुपये देण्याची तयारी सिडकोने दर्शवली असून येत्या संचालक  मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. ही रक्कम साडेसात टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे.

राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला २०० कोटी कर्जरूपी मदत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पायाभूत सुविधा पुरविणे हा सिडको आणि एमएसआरडीसी या दोन्ही प्राधिकरणांचा उद्देश असून, त्यामुळेच प्रकल्पाला सिडकोने हातभार लावला आहे.

-भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको