इमारती जवळील रस्त्याच्या रुंदीकरण प्रस्तावाला सिडकोचा नकार, पुनर्बाधणीत अडथळा

नवी मुंबई नेरुळ सेक्टर ६ येथील धोकादायक स्थितीतील दत्तगुरू सोसायटीच्या समस्यांत दिवसागणिक भरच पडत आहे. काही दिवसांपासून पालिकेने सोसायटीचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित केला असताना आता सिडकोने सोसायटीलगतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यास नकार दिला आहे. पालिकेने संमत केलेल्या प्रस्तावानुसार पुनर्बाधणीसाठी येथील रस्ता रुंद करणे आवश्यक आहे. त्यालाच सिडकोने नकार दिल्याने पुनर्विकास रखडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आणखी किती काळ जीव मुठीत धरून राहावे लागणार, असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे.

पालिकेने ३७८ इमारती धोकादायक तर ५८ इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. असे असताना केवळ दत्तगुरू सोसायटीचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. दत्तगुरू सोसायटीचा पुनर्विकास करताना अडीच चटईक्षेत्र मिळणार असल्यामुळे येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, असा प्रस्ताव पालिकेने संमत केला होता, मात्र रस्ता रुंदीकरणास सिडकोने नकारघंटा वाजवल्याने दत्तगुरूच्या पुनर्विकासाला खोडा बसणार आहे. याबाबत पालिकेनेही सिडकोशी पुन्हा पत्रव्यवहार केला आहे.

दत्तगुरू सोसायटी अतिधोकादायक असून या सोसायटीच्या कंडोमिनियम जागेचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. ३९४ चौ.मी जागा सिडकोकडून कमी मिळाल्याने या दत्तगुरू सोसायटीचा पुनर्विकास रखडला आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षे पत्रव्यवहार केल्यानंतर दत्तगुरू सोसायटीशेजारी असलेल्या बाजार आणि दुकानांसाठीच्या भूखंडांतील जागा दत्तगुरू  सोसायटीला देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्या जागेवर पालिकेने मंदिर व भाजी मंडई बांधली होती. ती ७ दिवसांत तोडून टाकावी, असे पत्र पालिकेने सिडकोला दिले होते. पालिकेने याबाबतचा प्रस्ताव महासभेत संमत करून घेतला आणि जय दुर्गामाता भाजी मंडई पाडली.

दत्तगुरूच्या पुनर्विकासासाठी या सोसायटीलगतचे ९ मीटर व ११ मीटरचा रस्ता दोन्ही बाजूंनी वाढवून तो १५ मीटरचा करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर झाला. परंतु रस्ता रुंदीकरणामुळे सिडकोने महापालिकेस हस्तांतरित केलेल्या मैदानाची जागा, शाळेची जागा, समाजमंदिराखालील जागा बाधित होणार आहे. तसेच पालिकेने मंजूर केलेल्या प्रस्तावातील रस्ता सोसायटीच्या कंडोमिनियम खुल्या जागेतून जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक बाधित होणार असल्याचे कारण देत सिडकोने रुंदीकरणास नकार दिला आहे. याबाबत पालिका व सिडकोमध्ये लेखी पत्रव्यवहाराचे वादंग सुरू झाले असून पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांच्या निर्देशानुसार पालिकेच्या नगररचना विभागाने  सिडकोला पत्रव्यवहार करून रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावाबाबत विचारणा केली आहे. रस्ता रुंदीकरणाच्या वादात आता दत्तगुरू या पुनर्विकासाचे घोडे अडणार का, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. या मुद्दय़ावर सिडकोविरोधात राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे कळते.

पालिकेने रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव संमत केल्यानंतर सिडकोने पत्र पाठवून अनेक लोक बाधित होतील असे कारण देत रुंदीकरणास नकार दिला आहे. याबाबत आयुक्तांच्या आदेशानुसार सिडकोला गुरुवारी प्रस्ताव व पत्र पाठवले आहे.

– ओवैस मोमीम, संचालक नगररचना

नेरुळ येथील रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावाबाबत सिडकोच्या पत्रव्यवहाराविषयी संबंधित विभागांकडून  अधिक माहिती घेण्यात येईल.

– मोहन निनावे, जनसंपर्क अधिकारी, सिडको

सिडकोच्या मालकीच्या या सोसायटीच्या पुर्नविकासासाठी सिडकोनेच सुरवातीला जय दुर्गा मंडई तोडण्याचे पत्र दिले. पुनर्विकासासाठी पालिकेने रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव संमत केला असताना सिडकोने नंकारघंटा वाजवली आहे. त्यामुळे सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालंकांना जाब विचारण्यात येईल.

– सूरज पाटील, नगरसेवक